नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नॉएडामध्ये आफ्रिकन विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्लाप्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आलीये.
मनिष नावाच्या 12वीमधल्या मुलाचा काल अमलीपदार्थांच्या अतिसेवनानं मृत्यू झाला होता. त्याच्या निषेधार्थ आज सकाळी मोर्चा काढण्यात आला. आफ्रिकन विद्यार्थी अमली पदार्थ तस्करीमागे असल्याच्या संशयावरून मोर्चेकऱ्यांनी समोर दिसेल त्या आफ्रिकन विद्यार्थ्यांना चोप दिला.
यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झालेत. या घटनेचे पडसाद राजधानी दिल्लीतही उमटले. नायजेरियाच्या उच्चायुक्तालयानं परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याशी संपर्क साधला. स्वराज यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर कारवाईची सूत्रं वेगानं फिरली.
आफ्रिकन विद्यार्थ्यांना सुरक्षित वाटेल, असं वातावरण निर्माण करण्याची गरज असोसिएशन ऑफ आफ्रिकन स्टुडंट्स या संघटनेनं व्यक्त केली.