जबलपूर : आपल्या चार वर्षांच्या मुलाचं पालन पोषण योग्य पद्धतीनं होत नाही, म्हणून एका आईनंच आपल्या ६ महिन्यांच्या मुलीला जिवंत नाल्यात फेकून दिलं... मध्यप्रदेशातल्या रामपूर नयागांवमध्ये राहणाऱ्या रितू आहुजा या आईला पोलिसांनी अटक केलीय.
सिव्हिल लाईन क्षेत्रातून एका सुपारी व्यापारी सुशील आहुजा आणि रितू आहुजा यांची ६ महिन्यांची मुलगी अचानक गायब झाल्याची तक्रार पोलिसांत नोंदवली गेली होती. पोलिसांना ही सहा महिन्यांची चिमुरडी सापडली पण मृत अवस्थेत...
तपास सुरु करतानाच पोलिसांचा रितूवर संशय बळावला होता. पण, घटनेनंतर तब्बल दहाव्या दिवशी पोलिसांनी रितूला ताब्यात घेऊन चौकशी केली... यावेळी, रितूनंच ही घटना कथन केली.
डीआयजी मकरंद देऊस्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्या चार वर्षांच्या मुलाचं पालनपोषण योग्य पद्धतीनं होत नाही असं रितूला वाटत होतं. त्यामुळेच तिनं आपल्याच मुलीचा बळी दिलाय. एका दुकानाच्या सीसीटीव्हीत रितूला हातात कॅरीबॅग घेऊन जाताना पाहून पोलिसांचा संशय बळावला होता.
आपल्या मुलीला एका कॅरीबॅगमध्ये ठेऊन रितू तिला रामपूरला घेऊन गेली तिथल्या एका नाल्यात तिनं मुलीला जिवंतच फेकून दिलं... रितूनं ही घटना कथन केल्यानंतर पोलीस घटनास्थळावर पोहचले. तिथं तपास केल्यानंतर त्यांना मुलीचे अवशेष आणि कपडे सापडले. त्यानंतर पोलिसांनी रितूला अटक केलीय.
धक्कादायक म्हणजे, रितू हिच्या आणखी एका मुलीचा मृत्यू काही दिवसांपूर्वी दूध पिताना संशयास्पदरित्या झाला होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.