अबब! एअर इंडियाच्या विमानात को-पायलटची कॅप्टनलाच मारहाण

सहवैमानिकानं जर्मन विंग्जचे विमान मुद्दाम पाडून दीडशे प्रवाशांचा जीव घेतल्यानंतर वैमानिकांचं मानसिक स्वास्थ्य आणि सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलेला असतानाच एअर इंडियाच्या कॉकपीटमध्ये दोन वैमानिकांमध्ये मारहाण झाल्याचं वृत्त आहे. 

Updated: Apr 6, 2015, 11:36 AM IST
अबब! एअर इंडियाच्या विमानात को-पायलटची कॅप्टनलाच मारहाण title=

नवी दिल्ली: सहवैमानिकानं जर्मन विंग्जचे विमान मुद्दाम पाडून दीडशे प्रवाशांचा जीव घेतल्यानंतर वैमानिकांचं मानसिक स्वास्थ्य आणि सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलेला असतानाच एअर इंडियाच्या कॉकपीटमध्ये दोन वैमानिकांमध्ये मारहाण झाल्याचं वृत्त आहे. 

रविवारी संध्याकाळी जयपूरहून दिल्लीला येणाऱ्या एअरबस ए ३२० या विमानाच्या उड्डाणापूर्वीच कॉकपीटमध्ये मुख्य वैमानिक आणि सह-वैमानिकादरम्यान वाद झाला. त्यानंतर सह वैमानिकानं मुख्य वैमानिकाला मारहाण केली. एअर इंडियाच्या प्रवक्त्यानं मात्र हे वृत्त फेटाळून लावलं आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान उड्डाणाची तयारी सुरू असताना मुख्य वैमानिकानं सह-वैमानिकाला प्रवाशांची संख्या, इंधनाची माहिती, उड्डाणावेळी विमानाचं वजन आदी महत्वाच्या गोष्टी लिहून घेण्यास सांगितल्या. मात्र त्या सह-वैमानिकाला या गोष्टीचा राग आला आणि त्यांच्यात बाचाबाची सुरू झाली. त्यानंतर सह वैमानिकानं मुख्य वैमानिकाला मारहाण केली. 

याप्रकरणाची व्यवस्थित चौकशी करण्यात यावी आणि सह-वैमानिक दोषी आढळल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.