www.24taas.com,नवी दिल्ली
देशाच्या सरन्यायाधीशपदी अल्तामस कबीर यांनी आज शनिवारी राष्ट्रपती भवनात शपथ ग्रहण घेतली न्या. सरोस होमी कपाडिया यांच्याकडून अडीच वर्षानी कबीर यांनी सूत्रे स्वीकारली.
राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या कार्यक्रमाच्यावेळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमिद अन्सारी, पंतप्रधान मनमोहन सिंग, निवृत्त सरन्यायाधीश एस. एच. कापडिया, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, केंद्रीय कायदा व न्यायमंत्री सलमान खुर्शिद आदी उपस्थित होते.
कबीर हे १८ जुलै २०१३ रोजी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे ते सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी नऊच महिने असणार आहेत. ते सर्वोच्च न्यायालयाचे ३९ वे सरन्यायाधीश आहेत.
कबीर हे गरिबांचे वकील म्हणून ओळखले जातात. त्यांचा सामाजिक विषयांचा दांडगा अभ्यास आहे. कबीर यांचा जन्म १९ जुलै १९४८ रोजी कोलकात्यात झाला. त्यांचे शिक्षण एमए आणि एलएलबी कोलकाता विद्यापीठातून पूर्ण झाले. १९७३ मध्ये कोलकत्त्यातच त्यांनी दिवाणी आणि फौजदारी वकिली सुरू केली. निष्णात वकील अशी ख्याती झालेल्या कबीर यांची कोलकाता जिल्हा न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नेमणूक झाली होती.
६ ऑगस्ट १९९० रोजी कोलकाता न्यायालयात ते न्यायमूर्ती झाले. २००५ मध्ये याच न्यायालयाचे ते हंगामी मुख्य न्यायमूर्ती होते. त्याच वर्षी २००५मध्ये झारखंड उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी त्यांना बढती मिळाली आणि तेथूनच ते सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश झाले.
निष्णात कायदेतज्ज्ञ असलेल्या कबीर यांनी कर्नाटक विधानसभेच्या आमदारांना अपात्र ठरवण्याचा कर्नाटक विधानसभेच्या अध्यक्षांचा निर्णय रद्दबातल ठरवला होता. अध्यक्षांनी आपल्या मर्यादा आणि कायदेशीर तरतुदी ओलांडू नयेत, असे मत त्यांनी त्या निकालाच्यावेळी व्यक्त केले होते. पक्षाने निलंबित केलेली व्यक्ती खासदार राहू शकते, संसदेच्या कामकाजात सहभागी होऊ शकते आणि मतदानही करू शकते, असा महत्वपूर्ण निकाल त्यांनी दिला.