बेळगाव : बेळगावामध्ये कोट्यवधी किंमतीचे सांबरची शिंगे, हत्तीचे सुळे, वाघाची नखं आणि पँगोलीनची कातडी पोलिसांनी जप्त केली आहेत.
या तस्करीमागे आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. शहरातल्या शेट्टी गल्लीतल्या एका घरावर धाड घालून पोलिसांनी प्राण्यांची शिंगं, नखं, सुळे आणि चमडे हस्तगत केलंय.
या प्रकरणी पोलिसांनी सलीम चमडेवाले याला अटक केली आहे. ज्या घरात प्राण्यांची शिंगे, हस्तिदंत आणि अन्य वस्तू ठेवण्यात आल्या होत्या त्या घरात भूत असल्याची अफवा गल्लीत पसरविण्यात आली होती. त्यामुळे त्या घराकडे कुणीही फिरकतदेखील नव्हतं. घरात वीज देखील नव्हती त्यामुळे रात्रीच्या वेळी तिथं काय चालत? याचा कुणालाही थांगपत्ता लागत नव्हता.
सलीम आपल्या कारमधून प्राण्यांची शिंगे आणि अन्य वस्तू आणायचा आणि घरात ठेवायचा. नंतर शिंग, हस्तिदंत, वाघाची नखं आणि पँगोलीनचे कातडे आदी कारमधून मुंबईला न्यायचा आणि तेथून ते चीनला पाठवले जायचे. या साऱ्यामागे आंतरराष्ट्रीय रॅकेट असण्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. जप्त केलेल्या प्राण्यांची शिंगे आणि अन्य वास्तूचे मूल्यमापन करण्यासाठी पोलिसांनी वनखात्याशी संपर्क साधला आहे.