www.24taas.com, नवी दिल्ली
अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांच्यामध्ये फूट पडली असल्याचं उघडपणे अण्णा हजारेंनी जाहीर केलं. केंद्र सरकारने निवडणुकांपूर्वी लोकपाल आणावे, अन्यथा आपण देहत्याग करू असा इशारा अण्णांनी आज पत्रकार परिषदेत दिला. पण त्याचबरोबर अरविंद केजरीवाल यांचा आता आपल्या पक्षाशी कुठलाही संबंध राहिला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
अरविंद केजरीवाल यांचा आपल्या पक्षाशी काही संबंध नसल्याचं सांगतानाच केजरीवाल यांना आपला फोटो आणि नाव वापरण्यासही अण्णांनी मनाई केली आहे. हा निर्णय दुर्दैवी असल्याचं मान्य करत अण्णा हजारे म्हणाले, की आमचे मार्ग जरी भिन्न असले, तरी आमचं ध्येय एकच आहे.
या पत्रकार परिषदेला खुद्द केजरीवाल आणि सिसोदियाही उपस्थित होते. मात्र केजरीवाल यांनी कुठलीही प्रतिक्रिया देण्याचं टाळलं. परिषदेनंतर अण्णा आणि केजरीवाल एकाच गाडीतून निघाले. मात्र काही अंतरावर केजरीवाल उतरले आणि वेगळ्या गाडीत बसून निघाले.