www.24taas.com, झी मीडिया, रायपूर
छत्तीसगढ राज्यातील दुर्ग जिल्ह्यात झालेल्या वायू गळतीमुळे अनेक जणांचे प्राण गेल्याची घटना भिलाई प्रकल्पात घडली. याच्या चौकशीसाठी उच्च स्तरीय समिती नेमण्यात येईल, असे केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी सांगितले.
तोमर यांनी शुक्रवारी अपघातात जखमी झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितलं, केंद्र सरकार येत्या दोन दिवसांत या घटनेची चौकशीसाठी उच्च स्तरीय समिती नेमणार आहे. तसेच त्या समितीत भारतीय पोलाद विभागाचे अधिकारी नसतील.
समिती हा अहवाल 30 दिवसांत सादर करेल. अपघाताची चौकशी झाल्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल. घटनेत मृत अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांना 25 लाख रुपये तर कर्मचारी वर्गाच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपये देण्यात येतील तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना योग्यतेनुसार नोकरी देण्यात येईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त करत जखमींवर चांगले उपचार करण्यासाठी व्यवस्था करण्यास बजावले आहे. तसेच अशी घटना पुन्हा होऊ नये याची दक्षता घेण्याची सूचना दिल्यात.
भिलाई प्रकल्पात गुरुवारी सायंकाळी विषारी वायू गळती झाली. त्यामुळे कंपनीचे उप महाव्यवस्थापक बी के सिंग (56), उप व्यवस्थापक एन. के. कटारिया (56) तंत्रज्ञ अॅन्टिनीऊस सॅम्युअल (48), वरिष्ठ यंत्रचालक यारद राम साहू (53), सहाय्यक कर्मचारी रमेश कुमार शर्मा (58) यांना जीव गमावावा लागला होता. तर अपघातात 30 पेक्षा जास्त अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.