`आम आदमी` दिल्लीचे सरकार चालवेल - मुख्यमंत्री केजरीवाल

रामलीला मैदानात भ्रष्टाचार संपविण्यासाठी आंदोलन केले. हा प्रवास आता सुरू झाला आहे. दिल्लीतील जनता हताश झाली होती. इथल्या राजकारणामुळे देश खड्ड्यात चालला होता. ही लढाई केजरीवालांना मुख्यमंत्री करण्यासाठी नाही. आम आदमीचे सरकार बनले आहे, पण आम्ही एकटे लढू शकत नाही. सर्वजण मिळून ही लढाई लढू शकतो. असे सांगत आज मी किंवा माझ्या सहा सहकाऱ्यांनीच नव्हे, तर दिल्लीच्या प्रत्येक माणसानं मंत्री आणि मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे, असे प्रतिपादन नवनिर्वाचित मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 28, 2013, 01:05 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
रामलीला मैदानात भ्रष्टाचार संपविण्यासाठी आंदोलन केले. हा प्रवास आता सुरू झाला आहे. दिल्लीतील जनता हताश झाली होती. इथल्या राजकारणामुळे देश खड्ड्यात चालला होता. ही लढाई केजरीवालांना मुख्यमंत्री करण्यासाठी नाही. आम आदमीचे सरकार बनले आहे, पण आम्ही एकटे लढू शकत नाही. सर्वजण मिळून ही लढाई लढू शकतो. असे सांगत आज मी किंवा माझ्या सहा सहकाऱ्यांनीच नव्हे, तर दिल्लीच्या प्रत्येक माणसानं मंत्री आणि मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे, असे प्रतिपादन नवनिर्वाचित मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले.
रामलीला मैदानावर दिल्लीकरांच्या उपस्थित केजरीवाल यांनी शपथ घेतली. दोन वर्षांपूर्वी रामलीला मैदानावर अण्णा हजारे यांनी १३ दिवस उपोषण केले. अनेक उपोषण, आंदोलने केली. पण राजकारण बदलल्याशिवाय परिस्थिती बदलणार नाही. तेव्हा वाटले नव्हते की एवढा मोठा बदल होईल. अण्णा मला सांगत होते की, राजकारण चिखल आहे. त्यात जाऊन तुम्ही घाण व्हाल. पण मी त्यांना समजावून सांगत होतो की, हा चिखल साफ करण्यासाठी त्यात उतरूनच साफ करावा लागेल, असे केजरीवाल यांनी स्पष्ट केले.
सत्ता जनतेच्या हातात देण्यासाठी हा सगळा खटाटोप केला होता. आता `आम आदमी`चा विजय झाला आहे. जनतेने खूप मोठं काम करून दाखवलं आहे. प्रामाणिकपणेही राजकारण करता येऊ शकतं, निवडणूक जिंकता येऊ शकते हे दिल्लीच्या जनतेनं दाखवून दिले आहे. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार.
दिल्लीच्या दीड कोटी जनतेला ही लढाई लढायची आहे. आमच्याकडे सर्व प्रश्नांवर तोडगा आहे, असा गर्व आम्हाला नाही. आमच्याकडे जादूची छडी नाही. परंतु, आपण सारे एक झालो तर सर्व समस्या सोडवू शकतो. आमच्याकडे सर्व प्रश्नांवर तोडगा आहे, असा गर्व आम्हाला नाही. आमच्याकडे जादूची छडी नाही. परंतु, आपण सारे एक झालो तर सर्व समस्या सोडवू शकतो. दिल्लीची दीड कोटी जनता मिळून सरकार बनवेल आणि ते चालवेल, अशी व्यवस्था निर्माण करू, असे आश्वासन केजरीवाल यांनी आपल्या भाषणाच्यावेळी दिले.
आमदारकी, मंत्रीपदाचा गर्व होऊ देऊ नका. दुसऱ्यांचा गर्व तोडण्यासाठी आपण पक्ष स्थापन केला, असे होऊ नये. आपल्याला गर्व झाल्याने तो तोडण्यासाठी दुसऱ्या पक्षाला जन्म घ्यावा लागेल. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य द्या. जनतेपुढे जाऊन त्यांचे प्रश्न समजावून घ्या आणि हात जोडून नम्रपणे विचारा, असे आवाहन नव्या मुख्यमंत्र्यांनी केले. त्याचवेळी भ्रष्टाचार रोखण्यासाठी दिल्लीतील जनतेला शपथ दिली. मी लाच घेणार नाही आणि देणारही नाही. त्यानंतर केजरीवाल राजघाटावर पोहोचले.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.