नवी दिल्ली : याकूब मेमनला फाशी देण्यावरून नवा राजकीय वाद रंगू लागलाय... याकूब मुस्लिम असल्यानंच त्याला फाशी दिली जातेय, असा आक्षेप घेतला जातोय. तर याकूबला फाशी दिली जाऊ नये, असं मत रॉच्या माजी प्रमुखांनी व्यक्त केलंय.
याकूब मेमन दहशतवादी आहे की मुसलमान? हा सवाल उपस्थित होण्याचं कारण म्हणजे एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी केलेले वक्तव्य... 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्याचा सूत्रधार याकूब मेमनला फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीय. मात्र 'मुस्लिम असल्यानंच याकूबला फाशी दिली जातेय' असा दावा ओवेसींनी केलाय.
ओवेसींच्या या वक्तव्यानंतर आता विरोधाचे सूरही उमटू लागलेत. भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी तर ओवेसीला पाकिस्तानात जाण्याचा सल्ला दिलाय... तर जेडीयूचे अध्यक्ष शरद यादव यांनी ओवेसींच्या वक्तव्याचं जाहीर समर्थन केलंय. एवढा सगळा वाद झाल्यानंतर ओवेसी आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत.
याकूब मेमनची क्युरेटिव याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावली. त्यामुळं 30 जुलैला नागपूर जेलमध्ये त्याला फाशी देण्यात येणार असल्याचं समजतंय. मात्र, याकूब मेमननं पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात धाव घेतलीय. त्यावर पुढील सोमवारी सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर याकूबच्या फाशीला वारंवार धार्मिक रंग देणं योग्य आहे का? आणि दहशतवादी याकूब मुसलमान असल्याचं सांगून, भावना भडकावण्याचा प्रयत्न होतोय का? या प्रश्नांची उत्तरं राजकारण करणाऱ्यांना द्यावी लागणार आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.