www.24taas.com , झी मीडिया, जोधपूर
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपात अटकेत असलेले संत आसाराम बापू यांचा मेडिकल रिपोर्ट आज कोर्टात सादर करण्याची शक्यता आहे. काल जोधपूरच्या मथुरादास माथुर हॉस्पिटलमध्ये आसाराम बापूंचा एमआरआय काढण्यात आला. आसाराम बापू मागील १० दिवसांपासून तुरुंगात आहेत. त्यांच्याविरोधात आणखी काही तक्रारी आल्या असल्याचं पोलिसांनी सांगितलंय.
मेडिकल तपासणीवेळेस आसाराम बापू जरा घाबरलेले दिसत असल्याचं सांगण्यात येतंय. तसंच त्यांनी ब्लड टेस्टसाठी रक्त देण्यास नकारही दिला. माझ्यावर अत्याचार होत असल्याचं आसाराम बापू म्हणाले. तुरुंगात गंगाजल, बाहेरचं जेवण आणि खाजगी अंथरुण याबाबत आसाराम बापूंनी मागणी केलीय. त्याचसंदर्भात त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. कोर्टाच्या आदेशानुसार काल आसाराम बापूंची वैद्यकीय चाचणी करण्यात आली.
डॉक्टरांच्या एका पथकानं आसाराम बापूंना खरंच बाहेरच्या जेवणाची गरज आहे का? याबाबत तपासणी केली. ६ सप्टेंबरला जिल्हा आणि सत्र न्यायालयानं सुनावणी दरम्यान डॉक्टरांना आसाराम बापूंच्या तब्येतीविषयी तपासणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार त्यांच्या याचिकेवर निर्णय होणार आहे. दरम्यान, आसाराम बापू दिल्लीतल्या मोठ्या वकिलांना वकिलपत्र देऊन जामीन मिळवण्यासाठी अर्ज दाखल करणार असल्याचं सांगितलं जातंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.