www.24taas.com, मुंबई
आपल्या विविध मागण्यासाठी ‘ऑल इंडिया बँक एम्पॉईज असोसिएशन’नं बुधवार-गुरुवार असा दोन दिवसांचा संप पुकारलाय. यामुळे ग्राहकांना मात्र आपल्या बँकेतील व्यवहारांसाठी आणखी दोन दिवसांची वाट पाहावी लागणार आहे.
‘ऑल इंडिया बँक एम्पॉईज असोसिएशन’नं पुकारलेल्या या संपात सार्वजनिक क्षेत्रातील २७ बँकांचे अधिकारी-कर्मचारी, १५ खाजगी बँका आणि ८ विदेशी बँकांचे १० लाख कर्मचारी सहभागी होणार आहेत. शनिवार, रविवार आणि सोमवारी सार्वजनिक सुट्ट्या घेतल्यानंतर बुधवार आणि गुरुवार असे संपाचे दिवस निवडण्यात आलेत. त्यामुळे देशभरात आर्थिक व्यवहार थंडावणार आहेत.
येत्या गुरुवारी आणि शुक्रवारी बँकिंग कायदा विधेयकात दुरुस्ती विधेयकावर संसदेत चर्चा होतेय. हा दुरुस्तीचा केंद्र सरकारडा डाव हाणून पाडण्याचं ‘ऑल इंडिया बँक एम्पॉईज असोसिएशन’नं ठरवलंय. यासाठी मुंबईत आझाद मैदानावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
नॉन कोअर गोष्टींचे आउटसोर्सिंग करणं, भरती करण्यासाठीचा दर्जा उंचावणं, उमेदवारांचे परीक्षण करण्याची पद्धत उंचावणे, भरती करताना अधिकारी व क्लार्क या दोघांसाठीही कॉम्प्युटर वापराचे कौशल्य सक्तीचे करावे, क्लार्क व सब स्टाफसाठी किमान पात्रता अनुक्रमे पदवी व दहावी पास इतकी असावी अशा काही शिफारसी केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या खंडेलवाल पॅनेलनं केलेल्या आहेत. या शिफारसींना असोसिएशनचा विरोध आहे.