अहमदाबाद : गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांचा राजीनामा आज भाजपच्या संसदीय समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री वैंकय्या नायडू यांनी दिली आहे.
मंगळवारपासून भाजपची संसदीय बैठक सुरु झाली आहे. वयाची ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने त्यांना पद सोडायचे आहे. असे करून त्या चांगला पायंडा पाडत असल्याचं पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटलं होतं. गुजरातचे नेतृत्व नव्या दमाच्या नेत्याकडे देण्याची वेळ आली असल्याचं आनंदीबेन पटेल यांनी म्हटलं आहे.
'नोव्हेंबरमध्ये मी वयाची पंच्याहत्तर वर्षे पूर्ण करत आहे. त्यामुळे पुढील विधानसभा निवडणुकीपूर्वी आणि 2017 मधील व्हायब्रंट गुजरात परिषदेपूर्वी राज्याला नवे नेतृत्व मिळणे आवश्यक आहे.' असं आनंदीबेन पटेल यांनी फेसबूकवर म्हटले आहे.
पाटीदार समाजाचे आंदोलन आणि त्यानंतर हार्दिक पटेलच्या अटकेवरून झालेला वाद यामुळे भाजप अध्यक्ष अमित शहा हे आनंदीबेन यांच्यावर नाराज असल्याचं म्हटलं जात होतं. मंत्रिमंडळावरही त्यांचे नियंत्रण नसल्याचे सांगितले जात होते. तसेच, नुकत्याच राज्यात झालेल्या दलित मारहाण प्रकरणानंतर भाजप सरकारवर टीकाही झाली होती.