www.24taas.com
कोळसाखाण वाटप गैरव्यवहार प्रकरणी `कॅग`ने ठेवलेल्या ठपक्यामुळे आणि त्यावरून विरोधक घालत असलेल्या गोंधळामुळे दबून न जाता उलट काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज भाजपावरच पलटवार केला. भाजप खरा राजकीय पक्षच नाही. भाजप नेहमी ब्लॅकमेलिंगचं राजकारण करतं. त्यावरच त्यांची रोजीरोटी चालते. असं वक्तव्य करून सोनियांनी भाजपवर तोफ डागली आहे. मात्र भाजपाने यावरही उत्तर देताना जर घोटाळ्यासंबंधी उत्तर मागणं म्हणजे ब्लॅकमेलिंग असेल, तर आम्ही ते ही करू असं म्हटलं आहे.
कोळसाखाण घोटाळ्याप्रकरणी भाजपशी दोन हात करा आणि त्यांना चोख उत्तर द्या असं आवाहन सोनिया गांधींनी काँग्रेस खासदारांना केलयं. संसदेच्या कामकाजापूर्वी काँग्रेसच्या संसदीय दलाची बैठक पार पडली या बैठकीत सोनियांनी सभागृहात आक्रमक पवित्रा घेण्याचे संकेत दिले. भाजपच्या आरोपांना सडेतोड उत्तर दिलं जाईल असंही सोनियांनी सांगितलं. इराणच्या दौ-यावर पंतप्रधान रवाना झाले असताना संसदेत काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेण्याची रणनिती अवलंबलीये.
कॉग्रेसचे नेते जनार्दन द्विवेदींनी पत्रकारांना सांगितलं की, कोळसा घोटाळ्याप्रकरणी सोनिया गांधींनी संसदेत पहिल्यांदाच वक्तव्य केले आहे. पंतप्रधानांच्या राजीनाम्यावर सोनिया गांधी प्रथमच इतक्या आक्रमक झाल्या आहेत. आसाममधील देगल, देशातला दुष्काळ यांचा विचार करण्याऐवजी विरोधक विनाकारण सरकारला वेठीस धरत आहेत, असा आरोपच सोनिया गांधींनी केला.
एवढंच नाही, तर आपल्या खासदारांना आगामी निवडणुकीत भाजपला त्यांची जागा दाखवून द्या, अशी सूचनाही त्यांनी केली. कोळसा घोटाळ्यात सरकारला `मोठा माल` मिळाला आहे, असं सुषमा स्वराज यांनी केलेल्या विधानावरही सोनिया नाराज झाल्या. अब्बास नक्वी यांनी सोनियांवर `सुपर पीएम` अशी टीका केली आहे.