ऱाहुल गांधीवर प्रश्नचिन्ह, मोदी पर्व सुरू

काँग्रेसच्या राहुल गांधींच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून, भाजपच्या नरेंद्र मोदी पर्वाची सुरूवात झाल्याचे मानले जातेय...

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Dec 8, 2013, 10:34 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
चार राज्यांतल्या निवडणूक निकालांचा कौल हाती येतोय... छत्तीसगढचा अपवाद वगळता अन्य राज्यांमध्ये केंद्रातील सत्ताधारी काँग्रेसला जोरदार झटका बसलाय, तर दोन राज्यांत पूर्ण बहुमत आणि एका राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपने झेप घेतलीय... त्यामुळं काँग्रेसच्या राहुल गांधींच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून, भाजपच्या नरेंद्र मोदी पर्वाची सुरूवात झाल्याचे मानले जातेय...
लोकसभा निवडणुकीची सेमी फायनल म्हणूनच चार राज्यांतल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालाकडं पाहिलं जातंय.. या निकालावरच भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. मोदी विरूद्ध गांधी या लढाईत कोण बाजी मारणार, याची झलक ताज्या निकालांनी दाखवून दिलीय...
मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळालंय. राजस्थानातील विजयाचे श्रेय मुख्यमंत्रीपदाच्या संभाव्य उमेदवार वसुंधराराजे शिंदे यांनी मोदींनाच देऊन टाकलंय.. परंतु मध्य प्रदेशमध्ये हॅटट्रिक करणारे शिवराजसिंह चौहान हेच भाजपच्या यशाचे मुख्य सूत्रधार असल्याचं स्पष्ट झालंय.. दिल्लीमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपचं कमळ फुललंय. पण त्यामध्ये मोदींचा वाटा किती आणि काँग्रेसच्या विरोधात झालेल्या नकारात्मक मतदानाचा वाटा किती, हा प्रश्नच आहे. छत्तीसगढमध्ये सत्ता टिकवण्यासाठी भाजपच्या मुख्यमंत्र्याला संघर्ष करावा लागतोय... अशा परिस्थितीत अडव्हान्टेज भाजप अशी स्थिती असली तरी मतदारांनी नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदावर शिक्कामोर्तब देखील केलेलं नाही...
याउलट छत्तीसगडचा अपवाद वगळता दिल्ली, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचा अत्यंत दारूण पराभव झाल्यानं काँग्रेसच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय... काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार म्हणून राहुल गांधींकडे पाहिलं जातंय... परंतु काँग्रेसचा पप्पू निदान सेमी फायनलमध्ये तरी फेल झालाय... मात्र काँग्रेसचे नेते ही वस्तुस्थिती मान्य करायला तयार नाहीत..
नरेंद्र मोदी विरूद्ध राहुल गांधी या सामन्यात पहिला राऊंड मोदींनी जिंकला असला तरी लोकसभा निवडणुकीनंतर दिल्लीचे तख्त काबीज करणं वाटतं तेवढं सोप्पं नाही, हा धडा भाजपनंही गिरवण्याची गरज आहे... भाजपवरही आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलीय... आ रम नव्हे, तर दक्ष राहण्याचा आदेशच जनतेनं भाजपलाही दिलाय...

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.