लखनऊ : बसपाच्या अध्यक्षा मायवतींविरोधात उत्तर प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष दयाशंकर सिंह यांनी केलेल्या अभ्रद वक्तव्याची किंमत आता भाजपला मोजावी लागण्याची शक्यताय. उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक अवघी काही महिन्यावर असताना बसपाला या मुद्द्यावरून आयतं कोलीत मिळाले आहे.
राजकारण्यांच्या अंगात मस्ती शिरली की ते काय बरळतील याचा नेम सांगता येत नाही. उत्तर प्रदेश भाजपचे नव्यानं उपाध्यक्ष झालेल्या दयाशंकर सिंहांना अशीच पदाची गुर्मी चढल्याचं त्यांच्या वक्तव्यातून दिसत आहे. कार्यकर्त्यांना स्फूरण चढावं म्हणून दयाशंकर सिंहांनी बसपाच्या प्रमुख मायावतींविरोधात जे विधान केलं त्याची निंदा करावी तितकी कमी आहे.
मायावतींवरचं हे विधान सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर त्यांचा संताप होणं स्वाभाविक होते. त्याच संतापाचा उद्रेक राज्यसभेत दिसला
बाईट मायावती. मायवतींचं नाव घेऊन राजकारणाची पोळी भाजू पाहणाऱ्या दयाशंकर सिंहांना मायावतींनी त्यांच्याच शब्दात राजकीय गणितं साधून उत्तर दिले.
मायावतींचा आक्रमक पवित्रा बघून अर्थमंत्री अरुण जेटलींनी परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला. इकडे संसदेत गदारोळ झाल्याचं समजल्यावर लगेच तिकडे दयाशंकर सिंहांनीही माफी मागितली.
पण या माफीमुळे दयाशंकर सिंहांना आपले पद वाचवता आलं नाही. त्यांना प्रदेश उपाध्यक्षपदावरून हटवण्यात आले आहे. पण मायावती समर्थकांनी दयाशंकर सिंहांविरोधात अट्रोसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे.
त्याचप्रमाणे बसपाने आज मोठ्याप्रमाणात आंदोलन उभं करण्याची तयारी केलीय. राज्यभरातले नेते लखनऊ एकत्र येऊन निदर्शनं करणार आहेत. दरम्यान भाजपनं पदावरून काढण्याचा निर्णय तातडीनं बदलून दयाशंकर सिहांना पक्षातून सहा वर्षांसाठी बडतर्फ केले आहे.