रथयात्रेत बॉम्ब ठेवणाऱ्या तीन दहशतवाद्यांना अटक

तामिळनाडू पोलिसांच्या विशेष तपास पथकाला तीन दहशतवाद्यांना अटक करण्यात यश मिळालंय. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी २०११ साली आयोजित केलेल्या रथयात्रेदरम्यान या दहशतवाद्यांनी बॉम्ब ठेवल्याचा तसंच भाजप आणि आरएसएसच्या नेत्यांच्या हत्येचा आरोप या दहशतवाद्यांवर आहे.

Updated: Oct 5, 2013, 04:36 PM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, नवी दिल्ली
तामिळनाडू पोलिसांच्या विशेष तपास पथकाला तीन दहशतवाद्यांना अटक करण्यात यश मिळालंय. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी २०११ साली आयोजित केलेल्या रथयात्रेदरम्यान या दहशतवाद्यांनी बॉम्ब ठेवल्याचा तसंच भाजप आणि आरएसएसच्या नेत्यांच्या हत्येचा आरोप या दहशतवाद्यांवर आहे.
या प्रकरणातील एका आरोपीला पोलिसांनी आधीच अटक केली होती. तामिळनाडू पोलिसांच्या विशेष तपास पथकाने एक दिवस आधी फकरुद्दीन नावाच्या एका संशयित व्यक्तीला अटक केली होती. फकरुद्दीननं दिलेल्या माहितीनुसार तामिळनाडू आणि आंध्रप्रदेश पोलिसांनी एकत्र कारवाई करुन आणखी तीन अतिरेक्यांना अटक केलीय. या तिघांचा भाजप आणि आरएसएस नेत्यांच्या हत्याप्रकरणात हात असल्याची माहिती मिळतेय. या तिघांचीही चौकशी सुरू करण्यात आलीय.
फकरुद्दीननं दिलेल्या माहितीनंतर त्याच्या तीन साथिदारांना पकडण्यासाठी पोलिसांनी पुत्तूर इथं एका घराला वेढा घातला. यावेळी अतिरेक्यांनी गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीदेखील गोळीबार सुरू केल्यावर मात्र अतिरेक्यांनी माघार घ्यावी लागली. त्यानंतर घरात लपलेल्या बिलाल मलिक, पन्ना इस्माइल आणि अबू बकर सिद्दीकी यांना पोलिसांनी अटक केली. दरम्यान चकमकीत पन्ना इस्माइल याला गोळी लागून तो जखमी झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.
दरम्यान, या कारवाईत रमेश नावाच्या एका पोलीस निरीक्षकाचा मृत्यू झाल्याचीही माहिती मिळतेय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.