नवी दिल्ली : हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरचे काम पुढील सहा वर्षांत पूर्ण होईल, तसेच आणि मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे भाडे हे विमानापेक्षाही कमी असेल, असं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटलं आहे.
हायस्पीड बुलेट ट्रेन प्रतितास ३५० किलोमीटर एवढ्या प्रचंड वेगाने धावू शकते. हायस्पीड बुलेट ट्रेन मुंबई आणि अहमदाबाद दरम्यानचे ५०८ किलोमीटर लांबीचे अंतर फक्त २ तासांमध्ये पार करणार आहे, ही गाडी प्रतितास ३५० किलोमीटर वेगाने धावू शकते.
दुरांतो एक्स्प्रेसला हेच अंतर कापण्यासाठी ७ तास लागतात. तसेच रेल्वे प्रकल्पांसाठी निधी वाटप करताना सर्वच राज्यांना न्याय देण्यात आला आहे, कोणावरही अन्याय झाला नसल्याचे रेल्वे मंत्री प्रभू यांनी सांगितले.
भारत सरकार जपानच्या मदतीने हा प्रकल्प पूर्ण करता येणार आहे. यासाठी जपानच्या आंतरराष्ट्रीय संस्थेने आधीच अभ्यास केला आहे. या प्रकल्पावर ९७ हजार ६३६ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे मंत्र्यांनी दिली आहे.