मुंबई : भारतासह जगभरात ख्रिसमसची धूम पाहायला मिळते. व्हॅटिकन सिटीमध्ये ख्रिसमसला उत्साहात आणि आनंदात सुरुवात झाली. जगाला शांतता आणि प्रेमाचा संदेश देणा-या प्रभू येशूच्या जन्म सोहळा कार्यक्रमानं व्हॅटिकन सिटीमध्ये ख्रिसमस सेलिब्रेशनला ख-या अर्थानं सुरुवात झाली. यावेळी पोप फ्रान्सिस यांनी दौरे केलेल्या विविध देशातील मुलं हजर आणि व्हॅटिकन सिटीतील ख्रिस्ती बांधव उपस्थित होते.. प्रभू येशूच्या जन्मानंतर मिड नाईट मास पार पडली..
शांतता आणि प्रेमाचा संदेश देणा-या ख्रिसमसचा उत्साह मुंबईतही पाहायला मिळाला. ख्रिस्ती बांधवांचं मुंबईतील प्रमुख श्रद्धास्थानांपैकी एक असलेल्या माऊंट मेरी चर्चमध्ये मिडनाईट मास पार पडली.
यावेळी मुंबईतसह देशातील विविध भागातल्या ख्रिस्ती बांधवांनी इथं गर्दी केली होती. मासनंतर ख्रिस्ती बांधवांनी कँण्डल लावत प्रभू येशूचं स्मरण केलं. विशेषतः माऊंट मेरी परिसरातील विविध दुकानांमध्ये खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं.
मेणबत्त्या, मास्क, सांता कॅप, किचेन आणि विविध गोष्टी खरेदी करण्यासाठी झुंबड उडाली होती. यावेळी नागरिकांनी एकमेंकांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्यात...
मुंबईतल्या वांद्रे परिसरात अनेक ख्रिस्ती बांधवांचं वास्तव्य आहे. त्यामुळं या परिसरात ख्रिसमसचा आनंद आणि उत्साह पाहायला मिळतोय. घरोघरी आकर्षणक सजावट आणि रोषणाई करण्यात आलीय. घराबाहेर स्टार लावून ख्रिसमसच्या शुभेच्छा देण्यात आल्यात. काही ठिकाणी तर प्रभू येशूच्या जन्माचे देखावेही साकारण्यात आलेत.