www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
दोषी खासदार आणि आमदारांना पाठिशी घालणाऱ्या वादग्रस्त वटहुकूमावर आज पंतप्रधान निवासस्थानी काँग्रेस कोर ग्रुपची एक बैठक पार पडली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैटकीत वादग्रस्त वटहुकूम मागे घेण्याच्या निर्णयावर एकमत झालंय.
बैठकित पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, अहमद पटेल आणि गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे उपस्थित होते. या बैठकीला संरक्षण मंत्री ए. के. अॅन्टोनी तसंच अर्थमंत्री पी. चिदम्बरम मात्र अनुपस्थित राहिले. थोड्या वेळामध्ये पंतप्रधान मनमोहन सिंग याच वटहुकूमावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर सायंकाळपर्यंत कॅबिनेटची बैठक पार पडेल.
याअगोदर, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी हा वटहुकूम का परत घेतला जावा, याविषयी पंतप्रधानांकडे आपलं मत मांडलं. ‘माझा उद्देश पंतप्रधानपदाचा अपमान करायचा नव्हता. मी केवळ जनतेची भावना त्यांच्यासमोर मांडली. अंतिम निर्णय कॅबिनेटलाच करायचाय’ असं त्यांनी यावेळी पंतप्रधानांना म्हटलंय.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान राहुल गांधींनी दिलेल्या स्पष्टीकरणानं संतुष्ट झालेत. त्यांनी राहुल गांधी यांचं म्हणण्याला होकारही दिलाय. याच पार्श्वभूमीवर कॅबिनेट्या आजच्या बैठकीत हा वटहुकूम परत घेतला जाऊ शकतो.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.