निरुपम, केजरीवालांना हवेत 'सर्जिकल स्ट्राईक'चे पुरावे...

भारतीय सेनेनं पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या 'सर्जिकल स्ट्राईक'मध्ये दहशतवाद्यांना ठार करणं आणि त्यांची तळं उद्ध्वस्त करणं, यावर आता भारतातच अंतर्गत राजकारण सुरू झालंय. 

Updated: Oct 4, 2016, 05:44 PM IST
निरुपम, केजरीवालांना हवेत 'सर्जिकल स्ट्राईक'चे पुरावे...  title=

नवी दिल्ली : भारतीय सेनेनं पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या 'सर्जिकल स्ट्राईक'मध्ये दहशतवाद्यांना ठार करणं आणि त्यांची तळं उद्ध्वस्त करणं, यावर आता भारतातच अंतर्गत राजकारण सुरू झालंय. 

भारतीय सैन्यानं जाहीर केलेली ही 'सर्जिकल स्ट्राईक' म्हणजे निव्वळ धूळफेक असल्याचा दावा काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी केलाय. जेव्हापर्यंत पंतप्रधान मोदी पुरावे सादर करणार नाहीत, तेव्हापर्यंत ही सर्जिकल स्ट्राईक खोटी असल्याचंच वाटेल. 

संजय निरुपम यांनी केलेल्या एका ट्विटमध्ये ते म्हणतायत, प्रत्येक भारतीयाला सर्जिकल स्ट्राईक हवीय, पण केवळ राजकीय फायद्यासाठी खोटे सर्जिकल ऑपरेशन योग्य नव्हे...

'ते' आदेश कुणाचे?

डीजीएमओला प्रेस कॉन्फरन्स करण्याचे आदेश कुणी दिले? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. भाजपाला राजकीय फायदा मिळवून देणारी सर्जिकल स्ट्राईक भारतीयांना नकोय. भारतीय सेनेचा वापर राजकीय उद्देशानं होऊ नये... राष्ट्रीय मुद्द्यांवर राजकारण खेळलं जाऊ नये, असंही म्हणत संजय निरुपम यांनी 'सर्जिकल स्ट्राईक'वर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत.  

केजरीवालांनाही मागितले पुरावे...

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही अगोदर याच कारवाईसाठी सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं होतं. आता मात्र त्यांनी सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे जाहीर करण्याची मागणी केलीय.

यापूर्वीही झाले होते 'सर्जिकल स्ट्राईक'

यापूर्वी माजी गृहमंत्री पी चिंदबरम यांनी... भारतीय सेनेनं यापूर्वी 'सर्जिकल स्ट्राईक' केल्या असल्याचं म्हटलं होतं. चिदंबरम यांनी दिलेल्या माहितीनुसार, यूपीए-2 सरकारच्या वेळी जानेवारी 2013 मध्ये सेनेनं मोठा हल्ला केला होता. परंतु, या हल्ला आम्ही जाहीर केला नव्हता. या हल्ल्याला भारत-पाकिस्तान नीतीबदलाच्या रुपात पाहणं खूपच घाई होईल, असंही त्यांनी म्हटलं होतं.