www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
दिल्ली निवडणुकीच्या निकालानंतर ‘आम आदमी पार्टी’नं पुन्हा एकदा जनतेचा दरवाजा ठोठावलाय. ‘आप’ आता जनतेकडे, दिल्लीमध्ये काँग्रेस किंवा भाजपसोबत सत्ता स्थापन करावी किंवा नाही, याबाबत सार्वमत घेणार आहे.
मंगळवारी सकाळपासून ‘आप’ची बैठक सुरू होती. दुपारी तीन वाजल्याच्या सुमारास ही बैठक संपली. त्यानंतर आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी मीडियासमोर येऊन जनतेशी संवाद साधला. दिल्लीत सत्तास्थापनेसंबंधी निर्माण झालेल्या पेचावर उत्तर शोधण्यासाठीही आपण जनतेचं मत विचारात घेणार आहोत, असं त्यांनी यावेळी सांगितलं. यासाठी ‘आप’नं जनतेला उद्देशून एक पत्रही जाहीर केलंय. यामुळे, सत्ता स्थानेसाठी ‘आप’चा निर्णय मात्र लांबणीवर पडलाय.
‘दिल्लीत कोणत्याच पक्षाला बहुमताचा आकडा गाठता आला नाही. यानंतर ‘आप’नं काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांना पत्र लिहून आपला पाठिंबा जाहीर केला होता. मात्र, यावेळी त्यांनी १८ अटीही या पत्रात नमूद केल्या होत्या. यानंतर काँग्रेस-भाजप मात्र एक झालंय. आपच्या पत्राला भाजपनं साधं उत्तरही दिलं नाही. काँग्रेसकडून उत्तर मिळालं पण, काँग्रेसचा काय भरवसा कसा करावा... आता पाठिंबा जाहीर करून वेळ येईल तेव्हा मात्र पाठिंबा काढून घेतील आणि सरकार पाडतील... काँग्रेस किती चाली खेळतं हे सगळयांना माहीत आहे. पण, लोकसभा निवडणुका समोर असल्यानं काँग्रेस आत्ता चाली खेळण्याची चूक करणार नाही’ असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलंय.
‘आप आपल्या जबाबदारीपासून पळ काढणार नाही. पण, यासाठी 'आप'नं जनतेकडून मतं मागवण्याचा निर्णय घेतलाय. तुम्ही तुमची मतं फोन, फेसबुक, वेबसाईट आणि एसएमएसद्वारेही नोंदवू शकता. जनतेचा निर्णय सोमवारी जाहीर केला जाईल’ असं आवाहन केजरीवाल यांनी जनतेला केलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.