www.24taas.com,नवी दिल्ली
महाराष्ट्रासह देशातल्या मच्छिमारांना केंद्र सरकारच्या निर्णयामुळं दिलासा मिळालाय. डिझेलचं सरकारी नियंत्रण काढल्यानंतर मच्छिमारांना प्रतिलिटर १२ रुपये जास्तीचे द्यावे लागत होते. मात्र मच्छिमारांना घाऊक ग्राहक न समजता किरकोळ ग्राहक समजावे असा निर्णय पेट्रोलियममंत्री विरप्पा मोईली घेतलाय. त्यामुळं मच्छिमारांना दिलासा मिळालाय.
महागड्या डिझेलच्या विरोधात राज्यातल्या मच्छिमारांनी मासेमारी बंद करण्याचा निर्णय घेतला होता. डिझेलच्या दरवाढीमुळे हवालदील झालेल्या मच्छीमारांना पेट्रोलियम मंत्रालयाने दिलासा दिला आहे. मच्छीमार सोसायट्यांना मिळणार्या डिझेल दरात पेट्रोलियम कंपन्यांनी केलेली ११ रूपये २० पैशांची दरवाढ कमी करण्याचा निर्णय पेट्रोलिय मंत्रालयाने घेतला आहे.
ही दरवाढ आता ७ रुपयांनी कमी करून ३ रूपये ५६ पैशांवर आणण्यात आली आहे. मात्र ही दरवाढही परवडणारी नसल्याचं मच्छीमार संघटनांचं म्हणणं आहे.त्यामुळे गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेलं मासेमारी बंदचं आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय मच्छीमार संघटनांनी घेतला आहे.