दीप्तीच्या अपहरणामागचं सत्य, तिच्याच तोंडून

स्नॅपडील या शॉपिंग वेबसाईटमध्ये काम करणारी सॉफ्टवेअर इंजिनिअर दीप्ती सरन 36 तासानंतर आपल्या घरी सुखरुप परतली

Updated: Feb 15, 2016, 04:10 PM IST
दीप्तीच्या अपहरणामागचं सत्य, तिच्याच तोंडून title=

गाझियाबाद: स्नॅपडील या शॉपिंग वेबसाईटमध्ये काम करणारी सॉफ्टवेअर इंजिनिअर दीप्ती सरन 36 तासानंतर आपल्या घरी सुखरुप परतली. घरी परतल्यावर दीप्तीनं आपल्याबरोबर नेमकं काय झालं, याची माहिती पोलिसांना दिली. या माहितीमुळे पोलिसांनाही धक्का बसला आहे. 

दीप्ती पोलिसांना काय म्हणाली ?

मी बुधवारी गुडगाववरून मेट्रोनं वैशाली स्टेशनला पोहोचली. तिकडे मी एक ऑटो पकडली, त्यामध्ये 6 जण होते. या ऑटोमध्ये ड्रायव्हरधरून 3 जण पुढे तर मागे मी आणि आणखी 2 जण मागे बसलो होतो.

ऑटो रस्त्यात बंद पडली

मोहननगर फ्लायओव्हर जवळ आमची ऑटो बंद पडली, त्यामुळे ड्रायव्हरनं सगळ्यांना खाली उतरवलं. त्यानं मागून येणाऱ्या ऑटोला थांबवलं, या ऑटोमध्येही 2 तरुण आणि 1 तरुणी होते. त्यामध्येच त्यानं मला आणि आणखी दोघांना बसवलं.

त्यांनी दाखवला चाकूचा धाक

यानंतर दुसरी ऑटोनं आम्ही मेरठ तिराहापर्यंत पोहोचलो, तेव्हा त्या युवकांनी ऑटोतल्या दुसऱ्या मुलीला चाकूचा धाक दाखवून खाली उतरवलं, आणि मलाही चाकूचा धाक दाखवला आणि ऑटो मेरठच्या दिशेनं घेऊन गेले. रस्त्यामध्येच त्यांनी माझ्या डोळ्याला पट्टी बांधली आणि हातही बांधून ठेवले.

ते अज्ञातस्थळ कोणतं ?

अपहरणकर्ते मला राजनगर एक्सटेंशनपर्यंत घेऊन गेले, आणि मला ऑटोतून उतरवलं, त्यानंतर त्यांनी मला 5 किमीपर्यंत चालवलं. तिकडे एक आय-10 गाडी उभी होती, ही गाडी चालवता येते का असं त्यांनी मला विचारलं. तेव्हा मी नाही सांगितलं. 

मी नाही म्हणाल्यावर, आम्हालाही गाडी चालवता येत नसल्याचं अपहरणकर्ते म्हणाले. पण त्यातलाच एकानं गाडी चालवायला सुरुवात केली. त्यानंतर माझ्या डोळ्याला पुन्हा पट्टी बांधण्यात आली, आणि मला पुन्हा एकदा अज्ञात स्थळी नेण्यात आलं. या ठिकाणी काही मशिनचा आवाज येत होता. 

त्यानंतर अपहरणकर्त्यांनी पुन्हा 20 किमीपर्यंत चालवलं. त्या ठिकाणी रेती आणि पाणी होतं. मी नदीच्या किनाऱ्यावर चालत असल्याचं मला वाटत होतं. 

त्या व्यक्तीची भेट घडवण्यासाठी अपहरण ? 

त्यानंतर अपहरणकर्ते मला ऊसाच्या शेतात घेऊन गेले, घाबरू नकोस आम्ही तुला त्रास देणार नाही, आम्ही फक्त एका व्यक्तीची आणि तुझी भेट घालून देऊ, असं ते मला म्हणाले. ही भेट झाल्यावर आम्ही तुला सोडून देऊ. त्यादिवशी त्यांनी मला दिवसभर शेतातच ठेवलं. त्यांनी मला सफरचंद आणि चिप्सही खायला दिले. 

अपहरणकर्त्यांनी 100 रुपये देऊन बसवलं ट्रेनमध्ये

त्यानंतर बाईकवरून ते मला दुसरीकडे घेऊन गेले. रात्री उशीरा त्यांनी मला शेतातून चालवलं, आणि एका छोट्या रेल्वे स्टेशनवर आणून सोडलं. शुक्रवारी त्यांनी माझ्या हातात 100 रुपये दिले, आणि मला ट्रेनमध्ये बसवलं. तिकडे मला हे नरेला स्टेशन असल्याचं समजलं, मग मी ट्रेनमध्ये बसलेल्या एकाकडून भावाला फोन केला, त्यानंतर भाऊ आणि बाबा मला घ्यायला आले.

दीप्तीनं दिलेल्या या माहितीमुळे पोलिसांनाही धक्का बसला आहे. अपहरण केलेले ते व्यक्ती कोण होते, त्यांचा उद्देश नेमका काय होता, याचा तपास आता पोलीस घेत आहेत.