www.24taas.com, झी मीडिया, चेन्नई
द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) या पक्षानं माजी केंद्रीय मंत्री आणि पक्षाचे दक्षिण क्षेत्रातील संघटन सचिव एम. के. अलागिरी यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलीय.
महत्त्वाचं म्हणजे, पुढच्या आठवड्यात तिरुचिरापल्ली इथं होणाऱ्या पक्षाच्या राज्यस्तरीय संमेलनाच्या अगोदर हा निर्णय घेण्यात आलाय. डीएमकेचे प्रमुख एम. करुणानिधी यांचा मोठा मुलगा अलागिरी हे आपल्या छोट्या भावाला - एम. के. स्टालिन यांना - पक्षाच्या प्रमुख पदावर बसवल्यानं नाराज आहेत. त्यामुळे ते पक्षातच फूट पाडत असल्याचा आरोप त्यांच्यावर केला गेलाय.
पक्षाचे महासचिव के. अनबाजनगन यांनी, अलागिरी हे पक्षातच भ्रम अवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि पक्षाच्या विरुद्ध काम करणाऱ्या काही सदस्यांविरोधात केलेल्या अनुशासनात्मक कारवाईवर टीका करत आहेत, असं पक्षाच्या वतीनं म्हटलंय.
`अलागिरी पक्षात राहिले तर ते पक्षाची तत्त्वचं धुळीला मिळवतील` असंही त्यांनी यावेळी म्हटलं. परंतु, अलागिरी यांचं निलंबन अस्थायी आहे असं त्यांनी स्पष्ट केलंय. पक्षातील सदस्यांच्या हिताचा निर्णय आम्हाला घ्यायला हवा आणि यामुळे पक्षाची एकजूट कायम राहील.
पक्षाविरुद्ध काम करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाईल, असं करुणानिधी यांनी ७ जानेवारी रोजी अलागिरी आणि इतरांना समज दिली होती. अलागिरी यांनी नुकताच लोकसभा निवडणुकीत `डीएमडीके` या पक्षासोबत हातमिळवणीच्या निर्णयाचा विरोध केला होता. यावरून करुणानिधी आणि अलागिरी या पिता-पुत्रातील वाद चव्हाट्यावर आला होता.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.