www.24taas.com, नवी दिल्ली
भारतीय मच्छिमारांच्या हत्या प्रकरणात भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला दिलेलं वचन पूर्ण करावं, असं म्हणतं काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मंगळवारी इटलीला चांगलंच झापलंय. मूळच्या इटलीच्या असलेल्या सोनियांच्या तोंडून हे उद्गार अनेकांना आश्चर्याचा धक्का देऊन गेलेत.
दोन भारतीय मच्छिमारांची हत्या प्रकरणात इटलीच्या मास्सिमिलिआनो लाटोरे आणि सल्वातोरे गिरोने या दोन सैनिकांवर खटला सुरू आहे. हे दोघे सैनिक मतदानासाठी मायदेशी परतले होते. मतदान केल्यानंतर त्यांनी पुन्हा भारतात परतण्याचे आदेश देण्यात आले होते पण इटलीच्या विदेश मंत्रालयानं मात्र भारताच्या उच्च न्यायालयाचा आदेश साफ धुडकावून लावला. यावर सर्वोच्च न्यायालयानं १४ मार्च रोजी इटलीच्या राजदूतांना परवानगीशिवाय देश न सोडण्याचे आदेश दिलेत. इटलीच्या भारतातील राजदूत असलेल्या मेंसिनी यांनी न्यायालयाला हे दोन्ही सैनिक निवडणूक प्रक्रियेनंतर भारतात परततील, अशी हमी दिली होती.
यावरच, काँग्रेस संसदील दलाच्या बैठकीत पक्षाच्या खासदारांसमोर बोलताना सोनिया गांधी यांनी इटलीला चांगलीच तंबी दिलीय. कुणीही भारताला गृहीत धरण्याचं धाडस करू नये आणि भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा मान राखून इटलीनं या दोन सैनिकांना भारतात धाडून आपला शब्द पाळावा, असं त्यांनी यावेळी इटलीला सुनावलंय.
शिवाय भारतीय मच्छिमारांच्या दुर्दशेवरही त्यांनी चिंता व्यक्त केली. भारतीय मच्छिमारांचा विषय गंभीर होत चाललाय. श्रीलंका नौसेनेकडून त्यांना ताब्यात घेण्यात येतंय तसंच त्यांच्यावर गोळीबारही होतोय. भारतीय मच्छिमारांविरुद्ध दररोज होणाऱ्या हिंसेवर कायमस्वरुपी तोडगा काढणं आवश्यक असल्याचंही त्यांनी म्हटलंय.