www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
उत्तराखंडात पावसा तडाखा आणि गंगेचा प्रकोप अनेकांच्या जीवावर बेतलाय. अजून हजारो जण आपला जीव मुठीत घेऊन मिळेल त्या ठिकाणी आसरा घेतला.
एक कुटुंब केदारनाथच्या हॉटेलमध्ये थांबल होतं. रात्रीच्या गडद अंधारात गंगेच्या महापुरात हे हॉटेल वाहून गेलं. मात्र नशिबानं वाचवलेल्या या कुटंबानं तब्बल दोन दिवस आणि दोन रात्री टेकडीवर बसून काढल्या. अखेर लष्कारचं हेलिकॉप्टर त्यांच्यापर्यंत पोहचलं आणि त्यांचा जीव वाचला. आपल्या नातेवाईकांना भेटल्यानंतर त्यांना गहिवरून आलं.
उत्तराखंडमध्ये पुरानं थैमान घातलं असतानाच राजधानी दिल्लीलाही पुराचा धोका निर्माण झालाय. यमुना नदीचा प्रवाह पूरपातळीपेक्षा २ मीटर जास्त आहे. उत्तराखंडमध्ये चिखलाचे साम्राज्य दिसून येत आहे. त्यामुळे येथे रोगराई पसरण्याचा धोका आहे.
उत्तराखंडमध्ये अडकलेल्या पर्यटकांना वाचवण्यासाठी मदतकार्यात जोरात सुरू असल्याची माहिती पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी दिलीय. आतापर्यंत १० हजार जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय. मात्र अजून ५२ हजार जणांच्या सुटकेचे आव्हान प्रशासनासमोर आहे. लष्कराच्या २२ हेलिकॉप्टर्सच्या मदतीनं नागरिकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कालपेक्षा आज हवामान चांगलं असल्यामुळं मदत कार्याला वेग येत असल्याचंही त्यांनी सांगितलंय. मात्र रस्ते खचल्यामुळं थोडा अडथळा निर्माण होत आहे.
दरम्यान, उत्तराखंडच्या फ्लॅश फ्लडमध्ये राज्यातले १ हजार ३५३ भाविक अडकल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सरकारनं दिलीय. आज झालेल्या कॅबिनेटमध्ये यावर विस्तृत चर्चा झाली. राज्यातल्या एका भाविक महिलेचा या जलप्रलयात मृत्यू झाला. त्या दिशेनं सरकार चौकशी करत आहे.
अडकलेल्या भाविकांपैकी ३३४ जणांशी सरकारचा अजुन संपर्क होऊ शकलेला नाही. सुखरूप बाहेर काढण्यात आलेल्या यात्रेकरूंना दिल्लीहून विशेष विमानानं आणण्याची व्यवस्थाही राज्य सरकार करणारय. तसंच या पुरस्थितीवर मात करण्यासाठी उत्तराखंड सरकारला १० कोटींची मदत देण्याचा निर्णयही राज्य सरकारनं घेतलाय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.