नवी दिल्ली : भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एक महिला भारतीय निमलष्करी दलातील सशस्त्र सीमा बलाच्या प्रमुखपदी विराजमान होणार आहेत. अर्चना रामसुंदरन यांची या पदावर नुकतीच नियुक्ती करण्यात आलीय.
पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट नियुक्ती समितीने या नियुक्तीला मंजुरी दिली आहे. रामसुंदरन या सध्या नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या विशेष संचालक या पदावर कार्यरत आहेत. त्यांची आता सीमा सुरक्षा दलाच्या प्रमुखपदी सप्टेंबर २०१७ पर्यंत म्हणजेच त्यांच्या निवृत्तीपर्यंत नियुक्ती करण्यात आली आहे.
अर्चना या १९८० सालच्या तामिळनाडू कॅडरच्या अधिकारी आहेत. २०१४ साली त्यांची सीबीआयमधील नियुक्ती वादग्रस्त ठरली होती. त्यानंतर त्यांची नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोमध्ये बदली करण्यात आली होती.
याशिवाय, आयपीएस ऑफिसर के दुर्गा प्रसाद यांची केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आलीय तर ऑफिसर के के शर्मा यांची सीमा सुरक्षा दलाच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आलीय.