बंगळुरू : तंत्रज्ञान आपल्याला तारक ठरतं तसं मारकही ठरतं. ही दुधारी तलवार आहे. तिचा वापर कसा करावा हे ज्याच्या त्याचावर अवलंबून असते. आत्महत्या कशी करावी यासाठी स्मार्टफोनवरील गुगलवर ४८ तास सर्च करून ८९ वेबसाईट्स पाहिल्या आणि २६ वर्षांच्या ईशाने १३ मजली उंच इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बंगळुरात घडली आली.
ईशा हांडा असे या तरुणीचे नाव आहे. फॅशन डिझायनर आणि डिझायनर कम वेलनेस कन्सल्टंट असलेल्या ईशाने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, हे अद्याप अज्ञात आहे. मात्र आत्महत्येपूर्वी तब्बल ४८ तास ती गुगलवर आत्महत्येबाबत वेगवेगळी माहिती सर्च करीत असल्याचे तिच्या स्मार्टफोनवरून स्पष्ट झाले आहे.
रविवारी रात्री येथील एचएसआर लेआऊटमधील शोभा क्लासिक अपार्टमेंटच्या १३ व्या मजल्यावरून उडी घेऊन ईशाने आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे. आधी पोलिसांनी हत्येच्या अंगाने याप्रकरणाचा तपास केला. मात्र घटनास्थळी आढळून आलेल्या तिच्या स्मार्टफोनवरून तिने आत्महत्या केल्याची शक्यता बळावली आहे.
आत्महत्या करण्यापूर्वी ४८ तास तिच्या मनात आत्महत्येबाबतचेच विचार घोळत होते. आत्महत्या करण्यापूर्वी आत्महत्या कशी करावी, त्यासाठीचा प्रभावी मार्ग कोणता? यासाठीच्या तब्बल ८९ साईट्स तिने सर्च केल्या. विष प्राशन, झोपेच्या अतिरिक्त गोळ्या सेवन करणे, गळफास लावणे, रेल्वेसमोर उडी घेणे, श्वास रोखणे, इमारतीवरून उडी मारणे अशा आत्महत्येच्या अनेक मार्गांबद्दल तिने जाणून घेतले. या प्रत्येक मार्गाचा वापर आणि यातून वाचण्याची शक्यता किती, हेही तिने तपासले. सर्व पडताळणीनंतर कथितरीत्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्येचा मार्ग तिने निवडला.
एवढेच नाही तर यानंतर इमारतीची उंची किती असावी, किती मजले असावे इथून तर उडी कशी घ्यावी, शहरातील उंच इमारती कोणत्या हेही तिने गुगल सर्चवर शोधले.
यानंतर रविवारी सकाळी ती बाहेर पडली. सरजपूर आणि हारालूर मार्गांवरील उंच इमारतींचा तिने शोध घेतला. यानंतर एचएसआर लेआऊटमधील शोभा क्लासिक अपार्टमेंटची तिने निवड केली. ही इमारत नवी होती आणि फारशी सुरक्षा नसल्याने यात शिरणे सोपे होते, असे तिला वाटले आणि ती खोलीवर परतली. संध्याकाळी पुन्हा एकदा सोबतच्या मैत्रिणीला मी उशिरा परतेल असे सांगून ती घरातून निघाली आणि पुन्हा परतलीच नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.