www.24taas.com, झी मीडिया, आग्रा
रेल्वे प्रवासात आता रेल्वे लहान मुलांसाठी काही खास ठरणार आहे. कारण, रेल्वेत लहान मुलांना मोफत जेवण दिलं जाणार आहे. यासाठी तुम्हाला आरक्षण करताना फॉर्ममध्ये लहान मुलांची माहिती भरावी लागेल.
रेल्वेत प्रवास करताना लहान मुलं सोबत असली तर पालकांना खूपच अडचणींना तोंड द्यावं लागतं. काही जण अगोदरच तयारी म्हणून लहान मुलांचं सगळं खाणं-पिणं सोबत घेऊन आपल्या सामानात भर घालतात. मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत लहान मुलांना मोफत जेवण देण्यावर विचार केला गेला.
या बैठकीनंतर, पाच वर्षांपर्यंतच्या मुलांना रेल्वेकडून मोफत जेवण देण्याची योजना बोर्डानं मंजुर केलीय. १६ मे रोजी रेल्वे बोर्डाच्या पॅसेंजर्स मार्केटींगच्या डायरेक्टर डॉ. मोनिका अग्निहोत्री यांनी हे निर्देश जारी केलेत.
यानुसार, शताब्दी, राजधानी, दुरांतो आणि प्रिमियम एक्सप्रेसचे थांबण्याची स्टेशन्स कमी असतात. त्यामुळे, या ट्रेनमध्ये पाच वर्षापर्यंतच्या मुलांना मोफत जेवण दिलं जाईल. रिझर्व्हेशन फॉर्ममध्ये पाच वर्षांपर्यंतच्या मुलांचं नाव, वय आणि खाण्यासाठी काय आवडेल? याबद्दलची माहिती भरावी लागेल. रिझर्व्हेशन फॉर्मच्या साहाय्याने पॅन्ट्री मॅनेजरला याबद्दलची माहिती पोहचविली जाईल आणि रेल्वेत प्रवास करणाऱ्या मुलांना रेल्वेकडून मोफत जेवण पुरविलं जाईल. त्यामुळे पालकांचीही समस्या सुटेल.
परंतु, रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेत मुलांना चॉकलेट किंवा टॉफी केवळ एकदाच पुरवण्यात येतील आणि रेल्वेच्या नव्या नियमानुसार या मुलांना जेवण पुरवण्यात येईल.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.