www.24taas.com, जयपूर
राहुल गांधींनी आपण मोठी जबाबदारी स्वीकारण्यास तयार आहोत, असं म्हणताच अनेक काँग्रेस आमदार, खासदारांची राहुल गांधींना पंतप्रधान करण्यात सहभाग असावा, असं भासवण्याची अहमहमिकाच लागली. पण यात सामान्य कार्यकर्ते, आमदार, खासदारच नव्हे तर दिग्विजय सिंग यांच्यासारखे ज्येष्ठ नेतेही मागे नव्हते. आता तर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोतही यात सहभागी झाले आहेत.
सद्भावना दिवसानिमित्त काँग्रेस कमिटी मुख्यालयात आयोजित केलेल्या सद्भावना कार्यक्रमात राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी म्हटलं, “फक्त काँग्रेसनेच नव्हे तर संपूर्ण देशानेच पार्टी महासचिव राहुल गांधींना भावी पंतप्रधानांच्या भूमिकेत स्वीकारलं आहे.”
दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात गहलोत म्हणाले, “संपूर्ण देश आता राहुल गांधी काय निर्णय घेणार, याचीच वाट पाहात आहे. राहुल गांधींनी पंतप्रधान व्हावं यावर संपूर्ण भारताचं एकमत आहे.”आपल्या वैयक्तिक भावना आणि देशाच्या भावना यांच्यात गहलोत यांनी गल्लत तर केली नाही ना, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.