www.24taas.com, नवी दिल्ली
वाढत्या महागाईला तोंड देण्यासाठी सरकारनं केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. महागाई भत्त्यामधील वाढ ही सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार करण्यात आली आहे.
ऐन गणेशोत्वाच्या दिवसांत ही बातमी समजल्यानं केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या गोटात आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण दिसतंय. डिझेलची दरवाढ आणि महागाईमध्ये वाढ झाल्यानं केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ७ टक्के वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय. या निर्णयाचा केंद्र सरकारच्या ८० लाख कर्मचार्यांतना फायदा होणार आहे. डिझेलच्या किमतीमध्ये प्रत्येकी लिटरमागे ५ रुपये दरवाढ झालीय. तसंच ग्राहक किंमत निर्देशांक १०.०३ टक्क्यांवर पोहोचला. यामुळे केंद्र सरकार महागाई भत्ता ६५ टक्क्यांवरून ७२ टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. या निर्णयाचा फायदा केंद्र सरकारच्या ५० लाख कर्मचारी व ३० लाख निवृत्तीधारकांना होणार आहे. तसंच हा महागाई भत्ता गेल्या १ जुलैपासूनच देण्यात येणार आहे.
केंद्र सरकारने मार्च महिन्यामध्ये महागाई भत्ता ५८ टक्क्यांवरून ६५ टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला होता. हा महागाई भत्ता १ जानेवारीपासून देण्यात आला. महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्याच्या निर्णयावर आज होणार्यार केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होईल.