गुडन्यूज, पीएफ'मधून ५० हजार काढण्यावर कर नाही!

भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफमधून (PF) ५o हजार रुपये काढल्यास त्यावर १ जूनपासून मुळातून प्राप्तीकर (टीडीएस) कपात केली जाणार नाही. या निर्णयामुळे ईपीएफओच्या सदस्य असलेल्या कर्मचार्‍यांना दिलासा मिळणार आहे.

PTI | Updated: May 31, 2016, 10:05 AM IST
गुडन्यूज, पीएफ'मधून ५० हजार काढण्यावर कर नाही! title=

नवी दिल्ली : भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफमधून (PF) ५o हजार रुपये काढल्यास त्यावर १ जूनपासून मुळातून प्राप्तीकर (टीडीएस) कपात केली जाणार नाही. या निर्णयामुळे ईपीएफओच्या सदस्य असलेल्या कर्मचार्‍यांना दिलासा मिळणार आहे.

पीएफमधून काढण्यात येणार्‍या रकमेवर कपातीची मर्यादा ३० हजार रुपयांवरून ५० हजार रुपये करण्यात आली आहे. केंद्र सरकारने यासंबंधी अधिसूचनाही जारी केलेय, असे एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.
प्राप्तीकर कायदा १९६१च्या कलम १९२-ए मध्ये वित्तीय अधिनियमान्वये दुरुस्ती करून ही मर्यादा वाढविण्यात आली आहे, असे अधिसूचनेत म्हटले आहे. ही तरतूद १ जून २०१६ पासून लागू होणार आहे.

दरम्यान, टीडीएस कपातीसंदर्भात काही अपवाद आहेत. एका खात्यातून पीएफ दुसर्‍या पीएफ खात्यात वळती केल्यास टीडीएस कापला जात नाही. तसेच कर्मचार्‍याने पाच वर्षांनी पीएफ काढल्यास टीडीएस कापला जात नाही. 

कर्मचार्‍यांनी मुदतीआधी पीएफमधून पैसे काढू नयेत आणि दीर्घ मुदतीच्या बचतीसाठी प्रोत्साहीत करण्याच्या उद्देशातून सरकारने मुळातून प्राप्तीकर कपात (टीडीएस) करण्याचा नियम लागू केला होता. सध्याच्या तरतुदीनुसार पॅन नंबर दिलेला असेल तर, टीडीएस कपातीचा दर १० टक्के आहे. तथापि, १५ जी किंवा १५ एच फॉर्म संबंधित पीएफ सदस्य कर्मचार्‍याने सादर केला असेल तर, टीडीएस कापला जात नाही.