नवी दिल्ली : दिवसागणिक रस्ता अपघातांत वाढ होताना दिसत आहे. बरेचसे अपघात हे भरधाव गाड्या चालविल्यामुळे होत आहेत. त्यामुळे वेगावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचे पीटीआयने आपल्या वृत्तात म्हटले आहे. त्यादृष्टीने नवीन नियमावली केली आहे.
या नव्या नियमावलीनुसार वाहनांना नियमांचे ब्रेक लागणार आहेत. केंद्राच्या या नियमावलीनुसार प्रत्येक गाडीच्या पुढील बाजूस सेन्सर, मागील बाजूस कॅमेरा, एअर बॅग्ज, बेगाबाबत सावध करणारी यंत्रणा बसविणे बंधनकारक असणार आहे.
देशात सर्व दुचाकींमध्ये अॅंटी लॉकिंग ब्रेकिंग सिस्टीम तसेच कंबाईन ब्रेकिंग सिस्टीम 2019 पासून लावणे सक्तीचे असेल. 1 ऑक्टोबर 2018 पासून प्रत्येक गाडीची स्वयंचलित पद्धतीने तापसणी होईल. तसेच वाहन चालकांसाठी परवाना पद्धत स्वयंचलित पद्धतीने सुरु करण्यात येणार आहे.
गाडीला वेग मर्यादा असणार आहे. ही वेग मर्यादा 80 किलोमीटर आहे. मात्र, या वेगापेक्षा जास्त वेगाने गाडी पळविल्यास चालकाला दक्षतेचा इशारा देण्यासाठी सायरन लावणे सक्तीचे केले गेले आहे. त्यानुसार रस्ते व महामार्ग विभागाकडे लवकरच रिअर व्ह्यू सेन्सर आणि मागील बाजूस कॅमेरा लावण्याचे बंधनकारक करण्यात येणार आहे. याची सूचना लवकरच काढण्यात येणार असल्याची माहिती या खात्याचे सहसचिव अभय दामले यांनी दिली.
देशात 50 हजार अपगात हे वेगवान गाडी चालविण्यामुळे होतात. त्यामुळे वेग वाढल्यास चालकाला सावध करणारे सायरन वाहनात लावणे सक्तीचे केले जाईल, असे दामले यांनी आंतरराष्ट्रीय रस्ते फेडरेशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सांगितले.