भूज, गुजरात : उत्तर प्रदेशमधील बलियामधील सिंग हे कुटुंब. पत्नी किरण सिंग आणि पती रवींद्र सिंग यांची अडीच वर्षांपूर्वी ताटातूट झाली. रवींद्र यांचा शोध घेऊनही उपयोग झाला नाही. या पती-पत्नीची भेट झाली ती अनोखी. या दोघांची भेट घडवून आणणारा दुसरा कोणी नाही तर व्हाट्सअॅप आहे.
अनेक जण सोशल मीडियाचा वापर चुकीच्या संदेशासाठी करतात. मात्र, या सोशल मीडियाचा वापर झाला तो एकमेकांपासून ताटातूट झालेल्या पत्नी आणि पतीची भेट घडवून आणण्यासाठी. WhatsAppने उत्तर प्रदेश ते गुजरात असे थेट कनेक्शन जोडले आणि हरवलेल्या पतीची भेट पत्नीला घालून दिली.
रवींद्र सिंग हे मानसिक रुग्ण आहेत. ते फिरत फिरत गुजरातमधील भूजमध्ये पोहोचले. ते एकटेत फिरत असल्याची बाब एका सेवाभावी संस्थेच्या लक्षात आली. या संस्थेनी रवींद्र सिंग यांना आपल्या संस्थेत आणले. त्यांच्यावर उपचार केले. त्यानंतर रवींद्र यांच्या कुटुंबियांची माहिती काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. शेवटी त्यांनी सोशल मीडियाचा वापर करण्याचा निर्णय घेतला.
लोकसेवा सार्वजनिक ट्रस्टने रवींद्र सिंग यांचा फोटो आणि संपर्कसाठी मोबाईल नंबर असलेला मेसेज व्हाट्सअॅपवर टाकला. त्यानंतर हा मेसेज रवींद्र यांच्या मित्राच्या वाचण्यात आला. रवींद्र गुजरातमधील भूजमध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सिंग यांच्या कुटुंबियांशी रवींद्र यांच्या मित्राने संपर्क करुन याची माहिती दिली. त्यानंतर रवींद्र यांची पत्नी किरण थेट भूजमध्ये पोहोचली तीही अडीच वर्षांनंतर. पती-पत्नीची भेट झाली आणि सिंग कुटुंबियांचा आनंद गगनात मावेनासा झाला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.