बाबांच्या ‘पतंजली’चं रजिस्ट्रेशन धोक्यात

योगगुरू बाबा रामदेव यांना आयकर विभागाकडून जोरदार झटका लागण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बाबा रामदेवांच्या ट्रस्टमधून चॅरिटेबल ट्रस्टचं रजिस्ट्रेशन रद्द केलं जाण्याची शक्यता आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Aug 28, 2012, 02:25 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
योगगुरू बाबा रामदेव यांना आयकर विभागाकडून जोरदार झटका लागण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बाबा रामदेवांच्या ट्रस्टमधून चॅरिटेबल ट्रस्टचं रजिस्ट्रेशन रद्द केलं जाण्याची शक्यता आहे.
आयकर विभागानं बाबा रामदेवांच्या विरुद्ध फास आवळण्याची जोरदार तयारी केलीय. रजिस्ट्रेशन रद्द झालं तर बाबा रामदेवांच्या ट्रस्टला मिळणाऱ्या सर्व सेवा-सुविधा तात्काळ थांबवण्यात येतील. आयकर विभागाच्या म्हणण्यानुसार, बाबा रामदेवांचं ट्रस्ट ‘पतंजली योगपीठ’ सध्या आर्थिक घडामोडींमध्ये व्यस्त आहे. याचबरोबर जेवढी कमाई करता येईल तेवढी करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असल्याचंही दिसून आलंय. आयकर विभागानं 100 प्रश्नांची एक यादीच पतंजलि योगपीठाकडे पाठवलीय. या प्रश्नांची समाधानकारक उत्तर न मिळाल्यास ट्रस्टला भलामोठा दंडही ठोठावला जाण्याची शक्यता आहे. शिवाय फसवणुकीच्या आरोपावरून ट्रस्टचं रजिस्ट्रेशनही रद्द केलं जाऊ शकतं.
आयकर विभागानं आत्तापर्यंत केलेल्या तपासात, बाबा रामदेवांची ट्रस्ट असलेलं ‘पतंजली योगपीठ ट्रस्ट’मध्ये 2009-10 सालादरम्यान अनेक मोठमोठे आर्थिक व्यवहार झाले असल्याचं निदर्शनात आलंय. म्हणजेच, पतंजली योगपीठ ट्रस्ट समाजसेवेच्या नावावर आयकरांत सूट तर मिळवतंच होतं पण त्याचसोबत ट्रस्टसाठी हा एक कमाईचाही मार्ग होता. आपली कमाई शून्य असल्याचंही ट्रस्टनं म्हटलं होतं. इन्कम टॅक्स विभागानं टाकलेल्या धाडीनंतर या ट्रस्टनं ७२.३७ करोड रुपयांची कमाई केल्याचं आत्तापर्यंत उघड झालंय आणि या पैशांवर इन्कम टॅक्स लागू होतो.
पतंजली विभागानं दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत आयकरात सूट मिळवत ७४.७४ करोड रुपये उत्पन्न मिळवलंय. त्यातील ८.७१ करोड रुपये खर्चही त्यांनी दाखवलाय. म्हणजेच त्यांनी उत्पन्नातील १२ टक्के खर्च केलाय. नियमांनुसार आपल्या उत्पन्नातील ८५ टक्के निधी समाजसेवेसाठी वापर करणा-या संस्थेलाच आयकरात सूट मिळू शकते. याशिवाय पतंजली ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारांत अनेक अनियमितता आयकर विभागाला सापडलीय.