www.24taas.com, नवी दिल्ली
रेहमान मलिक यांच्या बेताल वक्तव्यावर राजकीय पक्षांनी टीकेची झोड उठवलीय. ‘भारताच्या अंतर्गत प्रश्नावर बोलण्यापेक्षा पाकिस्तानात अराजकता माजलीय, त्याकडे लक्ष द्यावं’ अशी तिखट प्रतिक्रिया काँग्रेसनं व्यक्त केलीय. तर रेहमान मलिक यांनी बेताल वक्तव्याबाबत भारताची माफी मागावी, असं भाजपनं म्हटलय.
‘शाहरुख खानला भारत सरकारनं सुरक्षा पुरवावी’ असा अनाहूत सल्ला मलिक यांनी भारताला दिला होता. यावर भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी देश सक्षम असल्याचं सांगत केंद्रीय गृहसचिव आर. के. सिंग यांनी पाकचा अनाहूत सल्ला धुडकावून लावलाय. तसंच शाहरुखच्या सुरक्षेची काळजी करु नये, असा टोला शिवसेनेनं लगावलाय.
‘शाहरुख हा जन्मानं भारतीय आहे आणि तो नेहमीच भारतीय म्हणून राहणंच पसंत करेल. पण, मी भारत सरकारला आग्रहानं सांगू इच्छितो की शाहरुखला योग्य सुरक्षा पुरविली जावी. मी सगळ्या भारतीय बंधु-भगीनींना आग्रहानं सांगेन की, जे कुणी शाहरुखबद्दल नकारात्मक पद्धतीनं बोलत असतील त्यांनी हे लक्षात घ्यावं की तो एक सिनेस्टार आहे’ असं रेहमान मलिक यांनी म्हटलं होतं.
शाहरुखनं मात्र या प्रकरणात कुठलीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय. त्यानं सध्या तरी चुप्पीच साधलीय.