www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
प्रजासत्ताक दिनानिमित्त होणा-या संचलनात महाराष्ट्राचे राष्ट्रीय सेवा योजनाचे १६ स्वयंसेवक सहभागी होणार आहेत. देशातील एकूण १४८ स्वयंसेवकांचं नेतृत्त्व करण्याची संधी महाराष्ट्राला पहिल्यांदाच मिळाली आहे... त्यामुळे ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
दिल्लीत सध्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या महाराष्ट्राच्या १४ स्वयंसेवकांची प्रजासत्ताक दिनानिमित्त जोरदार तयारी सुरू आहे. २६ जानेवारीला राजपथावर होणाऱ्या संचलनात यावर्षी महाराष्ट्राचे १४ आणि गोव्यातील दोन असे सोळा स्वयंसेवक सहभागी होणार आहेत. संपूर्ण देशातून फक्त १४८ स्वयंसेवकांची या संचलनासाठी निवड होते. या समूहाचं नेतृत्त्व करण्याची संधी पहिल्यांदाचं महाराष्ट्राला मिळाली आहे. एनएसएसच्या संचलनाचं नेतृत्त्व बीडचा सोपान मुंडे करणार आहे. तर, दुसऱ्या फळीचं नेत्तृत्त्व वर्षा ठोंबरे करणार आहे.
या संचलनासाठी महाराष्ट्रात जिल्हा पातळीवरून विद्यार्थ्यांची निवड होते. मग राज्यपातळीवर आणि मग विभागवार निवड होते. दिल्लीत आल्यावर केलेला सराव आणि त्यात ज्याचं कौशल्य उत्कृष्ट त्याच पथकाला प्रजासत्ताक दिनी सलामी देण्याची संधी मिळते. ही संधी पहिल्यांदा महाराष्ट्राला मिळाली आहे. गेले अनेक दिवस हे स्वयंसेवक दिल्लीत दररोज सहा ते सात तास थंडी असो की पाऊस परेडचा सराव करत आहेत.
महाराष्ट्रातून आलेल्या या स्वयंसेवकांमध्ये हा जोश भरलेला आहे. सतत सराव करावा लागत असला तरी न थकता परेडमध्ये चुका होणार नाही यासाठी त्यांचे अथक परिश्रम चालू आहेत. महाराष्ट्र नेतृत्त्व करणार असल्यामुळे या स्वयंसेवकांना आपल्यावरील जबाबदारीची पुरेपूरं जाणीव आहे. आणि आता प्रजासत्ताक दिनी राजपथावर सलामी देण्यासाठी ते सज्ज झालेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ