विशाखापट्टणम : भारताची पहिली अण्वस्त्र सज्ज असलेली पाणबुडी युद्धनौका 'आयएनएस अरिहंत' आता नौदलात आपली सेवा बजावण्यासाठी रुजू होण्याची शक्यता आहे. या नौकेच्या झालेल्या चाचण्यांमध्ये ती सर्व पातळींवर उत्तीर्ण झाल्याचे वृत्त 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिले आहे.
'आयएनएस अरिहंत' ही भारताची पहिली स्वदेशी बनावटीची अण्वस्त्र वाहू पाणबुडी युद्धनौका आहे. खरं तर १९७० सालीच तिच्या बांधणीला मंजुरी देण्यात आली होती. मात्र लाल फितीच्या कारभारामुळे या युद्धनौकेला प्रत्यक्षात अस्तित्वात येण्यास २००९ उजाडले होते. २०१३ साली यावरील अणुभट्टीने पू्र्ण क्षमतेने काम करण्यास सुरुवात केली.
'आयएनएस अरिहंत'ची बांधणी विशाखापट्टणम येथे करण्यात आली आहे. त्यानंतर गेले पाच महिने तिथल्याच समुद्रात तिच्या विविध चाचण्या घेण्यात आल्या. यात खोल समुद्रातील चाचण्यांत उत्तीर्ण होणे अरिहंतसाठी कसोटीचे होते. नौकेच्या बांधकामासोबतच या चाचण्या घेण्यासाठी भारताला रशियाने मदत केली.
'आयएनएस अरिहंत'ला के१५ ही या ७०० किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य गाठू शकणाऱ्या तर के४ हे या ३५०० किलोमीटरचे लक्ष्य वेधू शकणाऱ्या क्षेपणास्त्रांनी सज्ज केले जाणार आहे.
याच प्रकारच्या आणखी दोन पाणबुड्यांवर सध्या विशाखापट्टणम येथे काम सुरू आहे. त्या 'आयएनएस अरिहंत'पेक्षा आकाराने मोठ्या आणि अधिक आधुनिक असणार आहेत. भारतीय नौदलात पाणबुडी युद्धनौकांची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. नौदलाची ताकद वाढवण्याची मागणी केली जात आहे. त्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत.