जम्मू-काश्मीरच्या पुरात 107 बळी, हवाईमार्गानं मदत

जम्मू-काश्मीरमध्ये पूराचा कहर सुरूच आहे. पूरातल्या बळींची संख्या आता 107 गेलीय. या भागातील जवळजवळ तीन हजार गावांना या पुराचा फटका बसलाय.  

Updated: Sep 6, 2014, 09:29 PM IST
जम्मू-काश्मीरच्या पुरात 107 बळी, हवाईमार्गानं मदत   title=

जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये पूराचा कहर सुरूच आहे. पूरातल्या बळींची संख्या आता 107 गेलीय. या भागातील जवळजवळ तीन हजार गावांना या पुराचा फटका बसलाय.  

गेल्या 50 वर्षांतली ही सर्वात भयंकर परिस्थिती असल्याचं राज्याचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी म्हटलंय. असहाय्य लोकांना हवाई मदतीनं वाचविण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिलीय.  

लष्कराचं बचावकार्य वेगात सुरू आहे. सेनेचे जवान आणि भारतीय वायुसेनेच्या दलाला जम्मूच्या विविध भागांतून जवळपास 9000 लोकांना वाचवण्यत यश आलंय. या अभियानासाठी जवळपास सेनेच्या 100 तुकड्या आणि वायुसेनेचे हेलिकॉप्टर कामाला लावलेत. अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलीय. पुलवामा, अनंतनाग आणि कुलगामसहीत दक्षिण कश्मीरचा काही भाग पाण्यात बुडालाय.

बचावादरम्यानच पुलवामामध्ये झेलम नदीच्या जोरदार प्रवाहात लष्कराचे नऊ जवान वाहून गेले होते. त्यातल्या सात जवानांना वाचवण्यात लष्कराला यश आलंय. 

पूरामुळे जम्मू उधमपूर रेल्वेमार्ग बंद झालाय. दरम्यान गृहमंत्री राजनाथ सिंह आणि पीएमओचे मंत्री जितेंद्र सिंह यांनी पूरग्रस्त भागाच्या परिस्थितीचा आढावा घेतला.  

वैष्णोदेवीचे 10 हजार भाविक अडकले
दुसरीकडे, वैष्णोदेवी यात्रेवर गेलेल्या 13 हजार यात्रेकरूंपैकी 10 हजार यात्रेकरु पुरामुळे कटरा इथं अडकून पडलेत. कटराहून जम्मूकडे येणारी रस्ते तसंच रेल्वे वाहतूक बंद आहे. कटराला जाणारी श्रीशक्ती एक्स्प्रेस उधमपूरजवळ रामनगरला थांबवण्यात आलीय. रामनगरमध्ये जवळपास 500 नागरिक अडकून पडलेत. यात्रेकरु रस्ते वाहतूक खुली होण्याची वाट पाहतायत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.