कानपूर: पत्नीची हत्या केल्याप्रकरणी अटक करणाऱ्या आरोपीला प्रेमानं समजावणं पोलीस अधिकाऱ्याला चांगलंच महागात पडलं असून त्याची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. हा प्रकार कानपूरमध्ये घडला आहे. बहुचर्चित ज्योती खून प्रकरणातील आरोपी पियुषला पोलीस स्टेशनमध्ये आणल्यावर सीओ आर.के. नायर यांनी चक्क त्याच्या कपाळाचं चुंबन घेतलं. हा प्रकार कॅमेरात कैद झाला होता, आणि त्यावरून सर्व स्तरांत चर्चा सुरू झाली.
नायर यांनी पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या पियुषला जवळ बोलावून त्याच्या कपाळाचं चुंबन घेतलं. तसंच आई-वडिलांना मान खाली घालायला लागलं, असं कृत्य भविष्यात पुन्हा न करण्याचा सल्लाही दिला. खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या आरोपीला कठोर शिक्षा करायची सोडून पोलीस त्याच्याशीच प्रेमानं वागले, हे पाहून सर्वांनाच धक्का बसला. अखेर त्या पोलिसावर कारवाई करण्यात आली असून त्याची पदावरून हकालपट्टी करण्यात आली.
आरोपी पियुषचे लग्नानंतरही अनैतिक संबंध सुरुच होते. मात्र त्याची कुणकुण ज्योती या त्याच्या पत्नीला लागल्यानं त्यानं तिची हत्या केली. त्यानंतर काही दिवसांपूर्वी त्यानं आपली पत्नी बेपत्ता असल्याची खोटी तक्रारही दाखल केली होती. मात्र पोलिसांनी त्यांचा खाक्या दाखवताच पियूषनं आपला गुन्हा कबूल केला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.