कलमाडी, राजा यांची संसदेत पुन्हा वर्णी

भ्रष्ट्राचाराचे आरोप असणाऱ्या नेत्यांवर केंद्र सरकारने पुन्हा मर्जी दाखवली आहे. ए. राजा आणि सुरेश कलमाडी यांची नव्याने स्वतंत्र स्थायी समित्यांवर नियक्ती केली आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 4, 2012, 10:19 AM IST

www.24taas.com,नवी दिल्ली
भ्रष्ट्राचाराचे आरोप असणाऱ्या नेत्यांवर केंद्र सरकारने पुन्हा मर्जी दाखवली आहे. ए. राजा आणि सुरेश कलमाडी यांची नव्याने स्वतंत्र स्थायी समित्यांवर नियुक्ती केली आहे.
ए. राजा हे माजी केंद्रीय मंत्री असून ते टू-जी प्रकरणातील प्रमुख आरोपी आहेत तर सुरेश कलमाडी हे राष्ट्रकुल गैरव्यवहारातील आरोपी आहेत. या दोन्ही नेत्यांनी जेलची हवाही खाल्ली आहे. भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर दोन्ही नेत्यांना केंद्रीय मंत्रिमंडाळातून डच्चू देण्यात आला होता.
ए. राजा हे द्रविड मुन्नेत्र कळघमचे सदस्य आहेत. राजा यांची ऊर्जासंबंधीच्या स्थायी समितीवर नियुक्ती करण्यात आली तर आणखी एक आरोपी खासदार कनिमोळी यांची नियुक्ती गृह खात्याशी संबंधित स्थायी समितीवर करण्यात आलीय. काँग्रेसचे सदस्य असलेल्या कलमाडी यांची परराष्ट्र व्यवहारविषयक स्थायी समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित विषयांची विधेयकांची तपासणी करून त्यात सुधारणा करण्याचे काम स्थायी समिती करते.
राजा यांना गतवर्षी २ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती. ते या वर्षी १५ मेपासून जामिनावर आहेत. खासदार कलमाडी हेही ९ महिने तुरुंगात होते. त्यांची १९ जानेवारी २०१२ रोजी जामिनावर सुटका झाली.

भाजप नेते यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वाखालील अर्थविषयक स्थायी समितीत काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांचा समावेश करण्यात आला. ते आधी मनुष्यबळ विकाससंबंधी स्थायी समितीत होते. द्रमुकचे तिरुची सिवा हे उद्योगविषयक स्थायी समितीचे अध्यक्ष तर बसपचे ब्रजेश पाठक आरोग्य आणि कुटुंबकल्याण समितीचे अध्यक्ष असणार आहेत.