www.24taas.com, नवी दिल्ली
कसबला फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी लवकरच होणार आहे, याबद्दल अगोदरच कल्पना दिली गेली होती. यावेळी ही बातमी पाकिस्तानात आपल्या आईलाही दिली जावी, अशी मागणी कसाबनं केली तुरुंग अधिकाऱ्यांजवळ केली होती. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी ही माहिती दिलीय.
भारताची आर्थिक राजधानी मुंबईवर २००८ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील एकमेव जिवंत आरोपी मोहम्मद अजमल कसाब आता जिवंत नाही. आज सकाळीच पुण्यातली येरवडा तुरुंगात त्याला दिल्या गेलेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यात आलीय.
केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अजमल कसाब याला त्याला दिल्या जाणाऱ्या फाशीच्या शिक्षेची कल्पना १२ नोव्हेंबर रोजी दिली गेली होती. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी कसाबच्या दयेचा अर्ज फेटाळल्यानंतर कसाबला ही माहिती देण्यात आली होती. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कसाब यानं आपल्याला दिल्या जाणाऱ्या फाशीच्या शिक्षेची माहिती पाकिस्तानात आपल्या आईला दिली जावी, असं तुरुंगाच्या अधिकाऱ्यांना सांगितलं होतं.
दरम्यान, कसाबला फाशी दिल्याचे आम्ही पाकिस्तानला कळविले आहे. पाकिस्तानातील भारतीय दुतावासाच्या अधिकाऱ्यांनी पाकिस्तानच्या सरकारला एका पत्राद्वारे ही माहिती दिली. पाकिस्तानने पत्र स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे आम्ही ही माहिती फॅक्सद्वारे कळविल्याचं, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज सकाळीच स्पष्ट केलंय. कसाबच्या फाशीसंदर्भात जी काही कारवाई करायची होती, ती मी माझ्याकडे फाईल आल्यावर तत्काळ केली. पाकिस्तानला या संबंधी माहिती कळविण्यात आली असून त्यांनी कसाबचा मृतदेह मागितला नाही, असंदेखील त्यांनी म्हटलंय.
विशेष म्हणजे, कसाबला फाशी देताना त्याची अंतिम इच्छा विचारण्यात आली... त्यावर त्याने आपली अंतीम इच्छा काहीच नाही, असं सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. 'अल्ला कसम ऐसी गलती दोबारा नही करूंगा' असे त्याचे अखेरचे शब्द होते. निर्विकार चेहऱ्याने तो फाशीला सामोरा गेल्याचे जेल प्रशासनाने सांगितले.