वडिलांच्या उपचारासाठी चिमुरड्यांचं मोदींना पत्र...

कानपूर : कानपूरमधील दोन चिमुरड्यांच्या मदतीसाठी पंतप्रधानांचं कार्यालय देवदूताप्रमाणे धावून आलंय. 

Updated: Mar 3, 2016, 04:34 PM IST
वडिलांच्या उपचारासाठी चिमुरड्यांचं मोदींना पत्र...  title=

कानपूर : कानपूरमधील दोन चिमुरड्यांच्या मदतीसाठी पंतप्रधानांचं कार्यालय देवदूताप्रमाणे धावून आलंय. एका पत्राची तत्काळ दखल घेत पंतप्रधान कार्यालयाने दखल घेऊन या मुलांना दिलासा दिलाय.

सुशांत मिश्रा (१३) आणि तन्मय मिश्रा (८) या दोन भावंडांनी काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहून आपल्या वडिलांच्या वैद्यकीय उपचारांसाठी मदत करण्याची विनंती सरकारला केली होती.

त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून त्यांचे वडील शिवणकाम करुन त्यांच्या कुटुंबाचा उदरर्निर्वाह करतात. गेल्या काही महिन्यांपासून त्यांना श्वसनाचा त्रास सुरू झाला. पण, त्यावर उपचार करण्यासाठीचे पैसे मात्र या कुटुंबाकडे पैसे नव्हते. 

वडिलांच्या मित्रपरिवाराने आणि नातेवाईकांनी सुरुवातीला मदत केली खरी पण, आता मात्र तो मदतीचा ओढाही आटला आहे, असे या चिमुरड्यांनी मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं.

पंतप्रधान कार्यालयाने त्यांच्या या विनंतीची दखल घेऊन या चिमुरड्यांना एक उत्तरादाखल पत्र लिहिले. पंतप्रधान कार्यालयाने जिल्ह्याच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना पत्र लिहून या मुलाच्या वडिलांना योग्य ती सर्व मदत करावी, असे आदेश दिले. उरसुला हॉरसोमन स्मृती जिल्हा रुग्णालयात आता त्यांच्यावर मोफत उपचार केले जात आहेत.

पंतप्रधान कार्यालयाने लहानग्यांना मदत केल्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही एका लहान मुलीच्या हृदयावरील शस्त्रक्रियेसाठी पंतप्रधान कार्यालयाने मदत केली होती. तसेच बंगळुरूमधील एका विद्यार्थ्याने पंतप्रधानांना पत्र लिहून थकीत रेल्वे पूलाचे काम मार्गी लावण्याची विनंती केली होती. या सर्व विनंतींना पंतप्रधान कार्यालयाने तातडीने उत्तर देऊन त्यांच्या समस्यांचे निराकरण केले होते.