मुंबईची कृती शहा `सीए` परीक्षेत प्रथम

गेल्या वर्षीप्रमाणं यंदाही सीए अर्थात ‘चार्टर्ड अकाऊंटस’च्या परीक्षेत मुंबईच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारलीय. कृती शहा ही विद्यार्थिनी देशातून पहिली आलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jul 17, 2013, 03:32 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
गेल्या वर्षीप्रमाणं यंदाही सीए अर्थात ‘चार्टर्ड अकाऊंटस’च्या परीक्षेत मुंबईच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारलीय. कृती शहा ही विद्यार्थिनी देशातून पहिली आलीय.
दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट ऑल इंडिया (आयसीएआय) तर्फे घेण्यात आलेल्या चार्टर्ड अकाउंटंट (सीए) परीक्षेत कृतीला ७६.३८ टक्के गुण मिळालेत. ती एनएम महाविद्यालयाची विद्यार्थिनी असून ती पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झालीय तर बोरिवलीचा केल्विन फर्नांडिस हा विद्यार्थी ७२.७५ टक्के गुण मिळवत दुसरा आलाय. तसंच जयपूरचा एस. आत्रेश हा विद्यार्थी ७२.१३ टक्के गुण मिळवून तिसरा आलाय. आयसीएआयतर्फे मे २०१३ मध्ये देशपातळीवरील सीएची अंतिम परीक्षा घेण्यात आली. सुधारित नियमांनुसार घेण्यात आलेली ही पहिलीच परीक्षा होती.

दरम्यान, आयसीएआयतर्फे कॉमन जून २०१३ मध्ये घेण्यात आलेल्या प्रोफिसिएन्सी टेस्ट (सीपीटी)चा निकालही जाहीर झाला आहे. सीपीटी परीक्षेत देशभरातील एक लाख ३८ हजार ७४६ विद्यार्थ्यांपैकी अवघे २७.०२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. परीक्षेला बसलेल्या १३ लाख ८ हजार ७४६ विद्यार्थ्यांपैकी ३७ हजार ४८९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, सीपीटीचा निकाल २७.२ टक्के लागला आहे. हैदराबाद, गुजरात व विजयवाडा येथील विद्यार्थ्यांनी सीपीटीमध्ये अव्वल क्रमांक पटकाविला आहे.