अडवाणी आणि बाबा रामदेव यांना मिळणार पद्म पुरस्कार?

 केंद्र सरकारनं भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना 'भारतरत्न' सन्मान जाहीर केल्यानंतर आता मोदी सरकार भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांचा 'पद्म' पुरस्कारानं गौरव करणार असल्याचं समजतंय. 

Updated: Jan 6, 2015, 02:28 PM IST
अडवाणी आणि बाबा रामदेव यांना मिळणार पद्म पुरस्कार? title=

नवी दिल्ली:  केंद्र सरकारनं भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना 'भारतरत्न' सन्मान जाहीर केल्यानंतर आता मोदी सरकार भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांचा 'पद्म' पुरस्कारानं गौरव करणार असल्याचं समजतंय. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पद्म पुरस्कारांच्या यादीत लालकृष्ण आडवाणी, तसंच योगगुरू बाबा रामदेव आणि प्रा. डेव्हिड फॉली यांच्या नावाचा समावेश आहे. विशेष  म्हणजे 'पद्म' पुरस्कारांसाठी शिफारस करण्याची अंतिम तारिख लोटून सुमारे चार महिने झालेले आहेत. 

बॅटमिंटनपटू सायना नेहवाल हिची 'पद्म' पुरस्कारासाठी शिफारस करण्याच्या मुद्यावरून वाद सुरू असतानाच या पुरस्कारासाठी आडवाणी आणि रामदेव बाबा यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्यामुळं या वादात आणखी भर पडण्याची शक्यता आहे. क्रीडा मंत्रालयानं सोमवारी बॅटमिंटनपटू सायना नेहवाल हिच्या नावाची शिफारस 'पद्मभूषण'साठी केली आहे.

सायना नेहवालची पद्म पुरस्कारांसाठी शिफारस करण्यावरून वाद झाला होता. पद्मभूषण पुरस्कार न मिळाल्यानं सायना नेहवालनं दोन दिवसांपूर्वी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. आपणही पद्मभूषण पुरस्कारासाठी पात्र आहोत. पद्मश्री पुरस्कारानंतर पद्मभूषणसाठी पाच वर्षांची जी अट आहे, ती मी देखील पूर्ण करते असं सांगत तिनं केंद्रीय क्रीडा मंत्रालयावर नाराजी व्यक्त केली होती. 

सायनानं उघडपणे व्यथा मांडल्यावर  क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी याप्रकरणाची दखल घेतली होती. 'पद्म' पुरस्कारांसाठी शिफारस करण्याची अंतिम तारिख लोटून सुमारे चार महिने झाले तरीही सोमवारी क्रीडा मंत्रालयानं गृह मंत्रालयाकडे सायनाच्या नावाची शिफारस केली. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.