www.24taas.com, नवी दिल्ली
शनिवारी राज ठाकरे यांनी दिल्ली गँगरेपमधील आरोपी बिहारी असल्याचं विधान केलं होतं. दिल्लीमधील अशा घटनांना परप्रांतीयच जबाबदार असल्याचंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. मात्र राज ठाकरेंच्या या विधानावरून बिहारच्या नेत्यांनी राज ठाकरेंना चांगलंच धारेवर धरलं आहे.
काँग्रेसचे नेते राशिद अल्वी यांनी राज ठाकरेंवर टीका करताना म्हटलं, की अशा वक्तव्यांमुळे भारताच्या एकात्मतेवर परिणाम होतो. झालेली घटना संपूर्ण देशासाठी निंदनीय आहे. त्यात महाराष्ट्र आणि बिहार असा भेदभाव करणं चुकीचं आहे. अशा विधानांमुळे लोकशाही कमकुवत होते.
याशिवाय जनता दल युचे नेते आणि बिहारचे मंत्री गिरीराज सिंग यांनीही राज ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. राज ठाचरंनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं असावं, असं गिरीराज सिंग म्हणाले. तसंच, अशा प्रकारची विचारधारा असलेल्या मनसे पक्षावर बंदी घातली जावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.