नवी दिल्ली: जगभरात आज आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात येतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह तब्बल ३५ हजार लोकांनी दिल्लीतील राजपथवर योगाभ्यास केला. यावेळी बोलत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजपथावरून योगदिनाचं महत्त्व सांगितलं.
तणावामुक्त होण्यासाठी योग महत्त्वाचा असून यामुळं जगभरात शांतता आणि नवीन उर्जा निर्माण करण्याची एक संधी मिळाली आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय. योगव्दारे शरीर, आत्मा, मन या सर्वांवर संतुलन मिळवता येतं असंही त्यांनी म्हटलं आहे.
भारतासह जगभरात आज २१ जूनरोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जात आहे. यानिमित्त दिल्लीतील राजपथवर योग सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासह सुमारे ३५ नागरिक उपस्थित होते.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी योगाचं महत्त्व सांगत योग करुन निरोगी राहण्याचा सल्ला दिला. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग दिनाला पाठिंबा देणाऱ्या संयुक्त राष्ट्र संघाचे आणि अन्य देशांचे जाहीर आभार मानले. दिल्लीतील राजपथ हा योगपथ होईल असा विचारही कोणीही केला नव्हता असंही त्यांनी नमूद केलं. शरीरात लवचिकता आणून त्याला विविध आकार देणे म्हणजे योग नाही, अन्यथा सर्कशीतील सर्वच जण योगी झाले असते असं त्यांनी सांगितलं. या कार्यक्रमाला आबालवृद्धांपासून सर्वच वयोगटातील नागरिक उपस्थित होते.
संबोधित केल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांमध्ये बसून योग केला. ३५ हजार नागरिकांनी ३५ मिनीटांमध्ये २१ योग प्रकार केले. कार्यक्रम संपल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिमुकल्यांशी संवाद साधला. पंतप्रधानांना बघून चिमुकल्यांनीही त्यांना गराडा घातला. मोदींभोवती गर्दी वाढल्यानंतर एसपीजीच्या जवांनाना मोदींना गर्दीतून बाहेर काढलं. दिल्लीसह देशाच्या विविध राज्यात योग दिनानिमित्त योगशिबीरांचं आयोजन करण्यात आलंय. मुंबईतील मरीन ड्राईव्ह इथं भरपावसातही योगदिनाचा उत्साह होता. तर नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत योगत्सोवाचं आयोजन करण्यात आलंय.
जगभरात १५० हून अधिक देशांमध्ये आज योग दिन साजरा केला जाणार असून मलेशिया, तैवान इथं योग दिन साजरा करण्यात आला. तर संयुक्त राष्ट्रातही योगदिवस साजरा केला जाणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.