शेतकरी कर्जमाफीवरून लोकसभेत गोंधळ

शेतक-यांच्या कर्जमाफीत झालेल्या घोटाळ्यावरून आजही विरोधकांनी संसदेत जोरदार गदारोळ केला. दोषींवर कडक कारवाई करण्य़ाची मागणी विरोधकांनी केली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 6, 2013, 08:02 PM IST

www.24taas.com,नवी दिल्ली
शेतक-यांच्या कर्जमाफीत झालेल्या घोटाळ्यावरून आजही विरोधकांनी संसदेत जोरदार गदारोळ केला. दोषींवर कडक कारवाई करण्य़ाची मागणी विरोधकांनी केली.
कॅगच्या अहवालातून पुढं आलेल्या गोष्टी देशासाठी लज्जास्पद असल्याची टीका विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी केली. तर दोषींना तुरूंगात डांबण्याची मागणी समाजवादी पक्षानं केली. राज्यसभेतही विरोधकांनी कर्जमाफी घोटाळ्यावर जोरदार गोंधळ घातला.
त्यानंतर स्वत: पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी कर्जमाफीत घोटाळा झाला असल्यास दोषींवर कडक कारवाई करणार असल्याचं आश्वासन दिलं. तर केंद्रीय कृषीमंत्री शरद पवारांनी चुकीच्या लाभार्थींना दिलेली रक्कम वसूल करण्यात येईल अशी माहिती दिलीय.

संसदेत गाजत असलेला कर्जमाफ घोळाचा जो मुद्दा आहे. त्याची सुरुवात झालीय ती कोल्हापूर जिल्ह्यातून. काही कर्ज प्रकरणांमध्ये अवैधरित्या कर्जमाफी झाल्याची तक्रार स्थानिक खासदारांनी केल्यानंतर हा मुद्दा ऐरणीवर आलाय. यामुळं जिल्ह्यातील जवळपास ४५ हजार शेतक-यांना माफ केलेले ११२ कोटी रुपये मागे गेलेत. तसंच त्यांना५ वर्षाचे व्याजही भरावं लागणार आहे.