नांदेड : सर्वात जास्त कृषी कर्ज हे मुंबई, पुणे आणि नाशिक या शहरांमध्ये वाटप करण्यात आल्याचा गौप्यस्फोट ज्येष्ठ पत्रकार पी साईनाथ यांनी केला आहे. ते देगलूर तालुक्यातील एका व्याख्यानमालेत बोलत होते.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे मलबार हिल आणि कफपरेड भागातही कृषी कर्ज वाटप करण्यात आले आहे, या भागात शेती आणि कोण शेतकरी आहेत हे आपल्याला शोधूनही सापडले नसल्याचं पी साईनाथ यांनी म्हटलं आहे.
यूपीए सरकारने कृषीकर्ज वाढवले असल्याचा दावा केला असला तरी याचा प्रत्यक्षात फायदा शेतकऱ्यांना तेवढा झालेला नाही. मागील दहा वर्षात दिल्ली आणि चंदिगडमधून कृषीकर्जाचं वाटप झालंय, पण प्रत्यक्षात तेथे शेतीच नाही.
महाराष्ट्रातील ग्रामीण भागात जवळपास ३७ टक्के कर्जवाटप झालं आहे, मात्र महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि नाशिकसारख्या शहरीभागात कृषीकर्ज वाटपाचं प्रमाण ५० टक्के आहे.
पी साईनाथ यांनी सांगितलेले काही महत्वाचे मुद्दे
शेतीतील भांडवल संपवण्याच्या या हालचाली आहेत. शेतीचे नियोजन केले जात नाही, त्यामुळे यापुढे कितीही पाऊस झाला तरी दुष्काळ हटणार नाही असंही साईनाथ म्हणाले.
विशेष म्हणजे, गेल्या दहा वर्षात 2 लाखापेक्षा कमी कर्ज घेण्याचं प्रमाण खूपच कमी झालं आहे. मात्र यामध्ये 5 ते 10 कोटी कर्ज घेण्याचं प्रमाण वाढलं आहे. याशिवाय शेतकऱ्यांची संख्यादेखील गेल्या काही वर्षापासून कमी झाली आहे.
हे कृषीकर्ज आहे, शेतकरी पॅकेज नाही. हे दर वर्षी दिलं जाणारं कृषीकर्ज आहे. 1989 सालापासून कृषी कर्जाचं प्रमाण कोसळत असून ते 2005 पर्यंत कोसळलं. त्यानंतर 2006-07 या वर्षात ते थोडं वर आलं, मात्र पुन्हा तीच परिस्थिती झाली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.