www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
‘आम आदमी पार्टी’चे नेते अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीमध्ये सत्ता स्थापनेचे संकेत दिलेत. पण, भारताच्या राजधानीच्या शहरात मुख्यमंत्री पदावर कोण विराजमान होणार? याचा अंतिम निर्णय त्यांनी आपल्या आमदारांवर सोडलाय.
जो व्यक्ती एखाद्या पक्षाचा नेता असतो तोच मुख्यमंत्रीपदावर आरुढ होतो, हीच आत्तापर्यंतची राजकीय परंपरा राहिलीय. केजरीवाल यांना पक्षाचे नेते म्हणून मान्यता मिळालीय. पण, अरविंद केजरीवाल यांनी आज केलेल्या वक्तव्यात ‘आमदार ठरवतील तोच मुख्यमंत्री बनणार’ असं स्पष्ट केलं असलं तरी त्यामुळे केजरीवाल तरी या पदावर बसण्याची इच्छा नाही, हे त्यामुळे स्पष्ट झालंय. सरळच सांगायचं झालं तर अरविंद केजरीवाल यांची नजर पंतप्रधानपदाकडे लागलीय.
जनतेनं दिलेल्या कौलाप्रमाणे (आत्तापर्यंत हाती आलेल्या) ‘आप’ दिल्लीत सत्ता स्थापन करणार असेल, तर त्याची गणितं जुळवणं सुरू झालंय. अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री बनण्यास नकार दिला तर स्पष्ट आहे की पक्षातील दुसऱ्या क्रमांकावरचे नेते मनीष सिसोदिया यांचा मुख्यमंत्रीपदाकडे रस्ता साफ झालाय.
आगामी लोकसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांना राष्ट्रीय स्तरावर पक्षाचा प्रचार-प्रसार करायचाय. दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रं आपल्या हाती घेतली तर केजरीवाल लोकसभा निवडणुकीत फारसं लक्ष घालू शकणार नाहीत. खुद्द केजरीवाल यांनीही अशीच शक्यता व्यक्त केलीय. ‘आप’च्या नेत्यांनी उपस्थित केलेल्या शंकेप्रमाणे, केजरीवाल यांना मुख्यमंत्रीपदावर बसवून काँग्रेस आणि भाजप त्यांना दिल्लीपर्यंतच सीमित ठेवण्याच्या प्रयत्नात आहे. कारण, दिल्ली निवडणुकीत अरविंद केजरीवाल आणि ‘आप’चा लोकांवरचा प्रभाव स्पष्टपणे दिसून आलाय. स्वत:ला दिल्लीत सीमित ठेवणं हे आत्मघाती पाऊल असल्याचं केजरीवाल यांना वाटतंय.
केजरीवाल यांच्यानंतर मनीष सिसोदिया यांना पक्षात वरिष्ठ स्थान आहे. शाजिया इल्मी आणि गोपाल राय यांना निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागलाय... तर संजय सिंह हे निवडणुकीपासून दूरच होते. ‘आप’च्या संरक्षकाच्या भूमिकेत योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांनी निवडणूक लढवलेली नाही. या पद्धतीनं केजरीवाल, योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण तीन राष्ट्रीय स्तरावर पक्षाची रणनीती बनविण्यासोबत दिल्लीतल्या ‘आप’च्या सरकारवरही लक्ष ठेऊ शकतील.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.